Pune News – शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, 50 ते 60 जण जखमी

सुट्टीनिमित्त शिवेरी किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 60 पर्यटक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाकडून मधमाशांना शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
रविवारी सुट्टी असल्याने जुन्रर येथील शिवनेरी गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. यावेळी गडावरील शिवाई मंदिराजवळ असलेल्या आग्या मोहळाला एका पर्यटकाने दगड मारला. यामुळे मधमाशा उठल्या आणि पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर गडावर एकच धावपळ सुरू झाली. किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी रुग्णवाहिका दाखल झाल्या. काही पर्यटक शिवाई मंदिरात अडकून पडले आहेत. तसेच काही विद्यार्थीही गडावर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे.
Comments are closed.