पिंपरीतील मतदारयादीत घोळात-घोळ !

>>

राज्यभरात बोगस, दुबार, तिबार मतदारांवरून रान पेटले असतानाच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल 92 हजार 664 दुबार, तिबार मतदार आढळल्याचे समोर आले आहे. ताकदवान असलेल्या आणि प्रस्थापित माजी नगरसेवकांची हक्काची एकगठ्ठा मते दुसऱ्या प्रभागात पळविल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही माजी नगरसेवकांची मतदारयादीतून नावेच गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारयादीवरून शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघांतील शहरातील 1 जुलै 2025 ला नोंद झालेल्या मतदारयाद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार आहेत. त्यात 9 लाख 4 हजार 815 पुरुष मतदार आहेत. आठ लाख 7 हजार 139 महिला मतदार असून, 197 तृतीयपंथीय मतदार आहेत. त्या मतदारयाद्या फोडून 1 ते 32 प्रभागांनुसार प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत प्रभाग क्र. 6 धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत या प्रभागांच्या यादीत चक्क मोशी, बोऱ्हाडेवस्ती, शिवाजीवाडी, कुदळवाडी या भागांतील मतदारांच्या नावांचा समावेश झालेला आहे. मोशीतील मतदारांची नावे असलेला भाग भोसरीतील प्रभागांच्या यादीत आला आहे. प्रभाग क्रमांक 8 बालाजीनगरमध्ये तब्बल साडेचार हजार मतदारांची नावे गायब झाल्याची हरकत स्थायी समितीच्या माजी
अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली आहे.

प्रभागनिहाय याद्या फोडताना हा खोडसाळपणा केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील 1 हजार 261 मतदारांची नावे शेजारील चिखली प्रभाग क्र.1 मध्ये टाकल्याचे समोर आले आहे. तळवडेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नावच दुसऱ्या प्रभागात टाकले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या एका उमेदवाराने प्रभाग क्रमांक 15 निगडी, प्राधिकरणातील काही मतदारांची नावे भोसरी मतदारसंघात टाकली होती. ती पुन्हा प्राधिकरणात घेण्याचा भाजपचा डाव आहे. प्रभागनिहाय मतदारयादी फोडल्यानंतर त्यात तब्बल 92 हजार 664 दुबार, तिबार मतदार आढळले आहेत. एका मतदाराचे नाव अधिक वेळा आले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या फुगली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून दुबार मतदारांची नावेही शोधली आहेत. ती संख्या 92 हजार 664 इतकी आहे. समान नावे असलेल्या मतदारांची पडताळणी केली जात आहे. एकच व्यक्ती असल्यास दुबार मतदार म्हणून त्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार छापले जाणार आहेत. त्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्यासाठी हमीपत्र घेतले जाणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

Comments are closed.