मतदार याद्यांना सोन्याचा भाव ! दोन दिवसांत महापालिकेला 10.49 लाखांची कमाई

महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू झालीय आणि या रणधुमाळीच्या आधीच खर्चाने बेजार इच्छुक उमेदवारांच्या खिशाला कात्री लागलीय! आता निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी ही सोन्याच्या भावात विक्रीला ठेवली असून, ऑनलाइन यादी डाउनलोड होत नसल्याने राजकीय पक्ष, प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष यादी विकत घ्यावी लागत आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते गुरुवारी ही यादी जाहीर झाली. पण यावर्षी मात्र या याद्यांची किंमत इतकी प्रचंड वाढली आहे की, ती उमेदवारी अर्जाच्या अनामत रकमेपेक्षा महाग ठरतेय. जुलै 2025 पर्यंत नोंदणीकृत मतदारांनुसार पुण्यातील 41 प्रभागांमध्ये एकूण 35,51,469 मतदार आहेत.

यातील सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग 9 सूस बाणेर-पाषाण असून, येथे तब्बल 1,60,000 मतदार, तर पाच सदस्यांचा असलेला प्रभाग 38 बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज या प्रभागात 1,48,000 मतदार आहेत. प्रभागात जितके जास्त मतदार तितकी मतदार यादीची जास्त पाने, आणि तितकीच जास्त किंमत असे महापालिकेचे गणित आहे.

गुरुवारपासून ते शनिवारपर्यंत 68 जणांनी मतदार यादीचे संच विकत घेतले. ऑनलाइन याद्या डाउनलोड होत नसल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. विविध पक्षांनी ऑनलाइन सुविधा सुरळीत करावी अशी मागणीदेखील केली. मतदार यादींच्या गोंधळावर राजकीय पक्षांचा आक्षेप मतदार यादीतील तफावत, नावांची गडबड, पत्ते चुकीचे असे प्रकार समोर आले आहेत.

महापालिकेने यादी ऑनलाइन उपलब्ध केली असली तरी लिंक उघडत नाही. फाईल डाउनलोड होत नाही. अनेक प्रभागांची माहिती अनुपलब्ध म्हणून यादी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही.

तीन दिवसांत 91 हरकती !

प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर केवळ तीन दिवसांत 91 हरकती दाखल झाल्या. सर्वाधिक हरकती येरवडा-कळस-धानोरी कार्यालयात असून, कसबा कार्यालयात 29 हरकती अशा एकूण 15 क्षेत्रीय कार्यालये व मुख्य कार्यालय मिळून 91 हरकती प्राप्त झाल्या आहेत.

Comments are closed.