ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर वाहनजप्तीची कारवाई

शहरात बेशिस्तपणे दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी वाहनजप्तीची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी ठिकठिकाणी नाकाबंदी करून ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना अडवून त्यांचे वाहन ताब्यात घेतले. जोपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केली जाणार नाही, तोपर्यंत वाहने मूळ मालकांना परत दिली जाणार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे.
बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी दामटली जात आहे. ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे अशा रीतीने वाहतूक निमयांचे उल्लंघन सर्रासपणे केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी आज ही कारवाई मोहीम राबविली.
पालकांनो, किमान 3 महिने दुचाकी मिळणार नाही !
मुलाचे लाड पुरविण्यासाठी पालकांकडून मुलांना दुचाकी हाती दिली जाते. प्रत्यक्षात मात्र मुलांकडून वाहतुकीचे नियमभंग करीत वाहने दामटली जात आहेत. त्यामुळे पोलिसांकडून थेट वाहनजप्तीची मोहीम हाती घेतली आहे. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांनो, सावधान ! तुम्ही कारवाईच्या जाळ्यात अडकल्यास किमान तीन महिने तुमचे वाहन माघारी मिळणार नाही. वाहन माघारी हवे असल्यास वयाचा पुरावा, इन्सुरन्स, आरटीओ पासिंग, आरटीओकडील एनओसी, पालकांचा कबुलीनामा यांसह विविध कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय दुचाकी मूळ मालकाला पुन्हा दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनो, काळजी घ्या. मुलांना वाहन परवाना असल्याशिवाय दुचाकी ताब्यात देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध वाहनजप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे. अपघांताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतूक नियमांचे पालन करण्याची मानसिकता निर्माण व्हावी या दृष्टीने मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने दुचाकीवर ट्रिपल सीट वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे, असे पुणे शहर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
Comments are closed.