निलंबित तहसीलदार येवलेंचा गडचिरोली ते पुणे भ्रष्ट प्रवास! 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप… बदली मात्र तीन वेळा पुण्यातच
पुणे शहराचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी त्यांच्या नायब तहसीलदार ते तहसीलदार या कारकीर्दीमध्ये गडचिरोली, चंद्रपूरपासून पुण्यापर्यंत केलेले भ्रष्ट प्रवास समोर आले आहेत. 14 वर्षांच्या सेवेत सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. घोटाळे आणि प्रशासकीय अनियमितता असतानाही त्यांची तीन वेळा पुण्यातच बदली झाली आहे. येवले यांना विदर्भातून पुणे शहरात आणण्यापर्यंत वरदहस्त कोणी दिला याचीदेखील चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क – मुंढवा येथील 40 एकर महार वतन जमिनीचा सरकारी भूखंड, बोपोडी येथील कृषी खात्याच्या जमिनीचा व्यवहार केला. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलेला पत्रव्यवहार तसेच बेकायदा निर्णय आणि जमिनीचा ताबा घेण्यासंदर्भात दिलेले पत्र यामुळे येवले यांना निलंबित करून फौजदारी गुन्हादेखील दाखल केला आहे.
उमरेडमध्ये लाच घेताना पकडले होते
येवले यांना 2011 मध्ये उमरेड (नागपूर) येथे 10,000 रुपयांची लाच घेताना पकडले होते. त्यांच्यावर 6 दोषारोपपत्रं ठेवण्यात आली. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते.
कोतवाल भरतीत लाच मागितल्याचा आरोप
2014 मध्ये चंद्रपूर जिह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात उमेदवाराकडून लाच घेतल्याचा आरोप झाला. एवढे सगळे असतानादेखील 2016 मध्ये पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी नियुक्त करण्यात आले.
इंदापूरमध्येही निलंबन झाले होते
2016 मध्ये पुण्यात इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू केले. 58 सरकारी जमिनींचे अनियमित वाटप, वाळूमाफियांशी संगनमत यामुळे निलंबन करण्यात आले. मोबोज हॉटेल जमीन घोटाळा, त्यानंतर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी दाखवलेली तत्परता यानिमित्ताने समोर आली आहे.
येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि दिव्यांग (कर्णबधिर) कोट्यातून पास होऊन नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पदी रुजू झाले. त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती, अशीदेखील चर्चा असून ते खरंच कर्णबधिर आहेत का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
Comments are closed.