सराईत गुन्हेगार गजा मारणेची गुन्हे शाखेकडून झाडाझडती, पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अ‍ॅक्टिव्ह

गुन्हेगारांच्या ग्लोरिफिकेशनवर पुणे पोलिसांकडून आता कडक वॉच ठेवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे डांगडिंग केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कुख्यात सराईत गजानन ऊर्फ गजा मारणे याची गुरुवारी झाडाझडती घेतली. त्याच्यासह साथीदारांकडून खंडणीविरोधी पथक दोनने माहिती संकलित केली. यापुढे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणार नसल्याची हमी त्याने दिली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून आले आहे.

मागील काही दिवसांपासून विविध गुन्ह्यांतील सराईत गुंड, टोळीप्रमुख, रायझिंग गँगविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर कुख्यात सराईत गजा मारणे याच्याही व्हिडीओचे ग्लोरिफिकेशन केले जात होते. मारणेच्या नावाखाली इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर वाहनांचा ताफा, जमलेली गर्दी, चालत येऊन गाण्यातून धमकीवजा इशाऱ्याचे अनेक व्हिडीओ गुन्हे शाखेच्या नरजेत आले होते. त्यापार्श्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने त्याला बोलावून घेत झाडाझडती घेतली.

गुन्हेगारांनी दहशतीसाठी केलेली कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाईचे धोरण निश्चित आहे. प्रामुख्याने सोशल मीडियाचा आधार घेऊन गुन्हेगारी उदात्तीकरणासाठी केलेले व्हिडीओ, रिल्सविरुद्ध कारवाई केली जात आहे, असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

बाकड्यावर बसून दिली माहिती

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांकडून सर्रास सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. दहशतीचे व्हिडीओ पोस्ट करून इशारा दिल्याचे उघडकीस आले होते. विशेषतः रायझिंग गँग, विरोधी टोळीला इशारा, जनमाणसातील प्रतिमा तयार करण्यासाठी गुंडांकडून रिल्स बनविले जात होते. दरम्यान, गुंडांचे सोशल मीडियावरील उदात्तीकरण थांबविण्यासाठी खंडणीविरोधी पथक दोनने सराईत गजा मारणेला कार्यालयाबाहेरील बाकड्यावर बसविले. त्याच्याकडून इतर माहितीही गोळा केली.

Comments are closed.