वराळे गोळीबाराचा तीन आठवड्यांनंतर छडा; कंपनीच्या व्यवस्थापकाची चुलत भावानेच दिली सुपारी
तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या चाकण औद्योगिक परिसरातील वराळे येथील स्टील कंपनीतील व्यवस्थापकावरील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले. चुलत भावानेच आर्थिक व्यवहारातून 12 लाखांची सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असून त्यातील दोघांच्या पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या.
संग्राम उर्फ चंदन अनंत सिंग (वय – 42, रा. मारुंजी), रोहित सुधन पांडे (वय – 23, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय विक्रम सिंग (वय – 35, रा. हिंजवडी) असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
20 जानेवारी रोजी महाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात व्यवस्थापक अजय सिंग यांच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली. अजय सिंग यांना दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकामार्फत सुरू होता. तांत्रिक विश्लेषणात अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याच्यावर पोलिसांना संशय आला. मात्र, त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसेल, असा विश्वास अजय सिंग व्यक्त करीत होते. तरी देखील पोलिसांनी तपास सुरू ठेवला.
एका व्यवहारात अजय यांनी संग्राम याला मदत केली. मात्र, त्याने ठरल्याप्रमाणे व्यवहार पाळला नाही. अजय यांच्या वरिष्ठांनी त्यांना विचारणा केली. त्यामुळे अजय यांनी संग्रामकडे विचारणा केली. या कारणावरून संग्रामने उत्तर प्रदेश येथील गुन्हेगारांना अजय यांना ठार मारण्यासाठी 12 लाख रुपयांची सुपारी दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, फौजदार अशोक जगताप, पी. पी. तापकीर, एस. एन. ठोकळ, व्ही. एच. जगदाळे, ए. पी. गायकवाड, जी. डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही. टी. गंभीरे, जी. एस. मेदगे, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, व्ही. डी. तेलेवार, व्ही. एन. वेळापुरे, आर. के. मोहिते, एस. टी. कदम, टी. ई. शेख यांनी केली.
आरोपींनी केली रेकी
आरोपींनी महाळुंगे येथे खोली भाड्याने घेतली. घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर आरोपींनी वेगवेगळ्या गाड्यांमधून रेकी केली. गुन्ह्याच्या अगोदर आरोपींनी पुण्यातील नाना पेठ येथून 70 हजार रुपयांना एक दुचाकी खरेदी केली. त्याच दुचाकीचा आरोपींनी गुन्ह्यासाठी वापर केला.
जखमी भावाला रुग्णालयात भेटायला आला
संग्राम हा जखमी भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात देखील येऊन गेला. त्याने पोलिसांना जराही संशय येऊ दिला नाही. मात्र, तो पोलिसांना अधिक काळ गुंगारा देऊ शकला नाही. त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला मध्य प्रदेश येथील एका रेल्वे स्थानकाच्या बाहेरून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार रोहित यालादेखील अटक केली.
Comments are closed.