Pune rain – पुण्यात अवकाळीचे धुमशान; बाणेर, बालेवाडी, धायरी, वाघोली, फुरसुंगीला मुसळधार पावसासह गारपीटीने झोडपले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढलेला असतानाच सोमवारी निसर्गाचा वेगळाच लहरीपणा पाहायला मिळाला. दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणेकरांची दाणादाण उडवली. बाणेर, बालेवाडी, धायरी आणि वाघोली परिसरात तर जोरदार गारपीट झाल्याने उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव आला.

सोमवार सकाळपासूनच पुण्याच्या आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती. दुपारी दोनच्या सुमारास हलक्या सरींना सुरुवात झाली, मात्र पाहता पाहता पावसाचा जोर वाढला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून वाढत्या तापमानापासून पुणेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

शहरातील विविध भागांत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे आहे. बाणेर, बालेवाडी, धायरी, वाघोली, फुरसुंगी या भागात गारपीट झाल्याचे वृत्त असून पुणे स्टेशन, सिंहगड रोड, मध्यवर्ती पेठा (शनिवार पेठ, सदाशिव पेठ), चंदन नगर आणि खराडी या भागात मुसळधार पाऊस पडला. तसेच चंदन नगर आणि खराडी परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला असून, दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.

Comments are closed.