आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज ‘अ

पुणे विधान परिषद निवडणूक 2026: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) उमेदवार निवडीवरून सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रचंड सावळागोंधळ आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रविवारी रात्री विक्रम काकडे (Vikram Kakde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, सोमवारी सकाळी पक्षातील नाराजांनी पुन्हा डोके वर काढल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर ‘जिजाई’ बंगल्यावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार आणि जय पवार (Jay Pawar) यांच्या उपस्थितीत तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी विक्रम काकडे आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांचा रितसर पक्षप्रवेश (Party Induction) पार पडला. मात्र, हा निर्णय जाहीर होताच राष्ट्रवादीत मोठी नाराजी उफाळून आली असून, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी पक्षनेतृत्वावर अत्यंत गंभीर आणि घणाघाती आरोप केले आहेत.

Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक ताकद पाहून उमेदवारी

उमेदवारी डावलल्यामुळे तीव्र नाराज झालेले माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. “विक्रम काकडे हे केवळ आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहेत, म्हणूनच त्यांना ही उमेदवारी दिली गेली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. पक्षश्रेष्ठींना उपरोधिक सल्ले देताना लांडे म्हणाले, “पक्षाने कोणत्या खाणीतून हा हिरा शोधून काढलाय, हे आम्हालाही कळेना! आज जर अजित दादा असते, तर त्यांनी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती. पण दादांच्या पश्चात आम्ही आता पूर्णपणे हतबल झालो आहोत.”

Pune Vidhan Parishad Election 2026: वाढदिवसाच्या दिवशीच झाला अपेक्षाभंग

विशेष म्हणजे आज विलास लांडे यांचा वाढदिवस (Birthday) आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पक्ष आपल्याला उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ (Birthday Gift) देईल, अशी मोठी अपेक्षा लांडे आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, ऐनवेळी नाव कापले गेल्याने त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. “विक्रम काकडेंना संधी दिलीये म्हणजे भविष्यात पक्षाची ताकद नक्कीच वाढेल,” असा टोमणा त्यांनी पक्षातील वरिष्ठांना मारला. कार्यकर्त्यांची पक्षाशी असणारी नाळ आता संपायला लागली असून, ‘अजित दादानंतर आपल्याला ताकद देणारा नेता पक्षात उरला आहे का?’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरे बैठकीतून तडकाफडकी बाहेर

दरम्यान, या जागेसाठी इच्छुक असलेले आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) हे देखील ‘जिजाई’ बंगल्यावरील या बैठकीला उपस्थित होते. मात्र, विक्रम काकडे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होण्याच्या काही वेळ आधीच सुनील टिंगरे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडल्याने, त्यांच्या मनातही तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत होते. एकीकडे काकडे पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित केला असला, तरी विलास लांडे यांच्या या बंडखोर आणि आक्रमक पवित्र्यामुळे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी वाढणार असून, मतफुटीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना- 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून

उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून

अर्ज माघारीची मुदत- 4 जून

मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)

मतमोजणी- 22 जून

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Sunil Tingre Pune Vidhan Parishad Election 2026: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले

आणखी वाचा

Comments are closed.