MPL 2025: पुणेरी बाप्पाचा निर्णायक विजय, रत्नागिरीसाठी अवघड झाले प्ले ऑफ्सचे गणित

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. सोमवारी पावसाने रद्द झालेल्या सामन्यांमुळे प्ले ऑफ्सचे गणित सर्वच संघांचे बिघडले होते. त्यामुळे या निर्णायक सामन्यात विजय मिळवणे संघासाठी अनिवार्य झालेले. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने विजय मिळवत महत्त्वाचे दोन गुण कमावले. यासह पुणेरी बाप्पाचे प्ले ऑफ्समधील स्थान पक्के झाले.

दुपारच्या सत्रात खेळल्या गेलेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने प्रथम फलंदाजी केली. धीरज फटांगरे शून्यावर बाद झाल्यानंतर, अथर्व धर्माधिकारी व किरण चोरमले यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. अथर्व याने 20 तर किरणने 37 धावांचे योगदान दिले. त्यानंतर अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर याने सर्वाधिक 43 धावा फटकावल्या. अभिषेक पवार यांनी वीस धावा करत संघाला 20 षटकात 154 अशी सन्मानजनक मजल मारून दिली. पुणेरी बाप्पा संघासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज सचिन भोसले याने 38 धावा देऊन महत्वपूर्ण चार बळी टिपले.

पुणेरी बाप्पा संघाला विजयासाठी 155 धावांची गरज होती. मात्र, पावसामुळे त्यांच्यासमोर 16 षटकात 132 असे आव्हान ठेवण्यात आले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर यश नाहर याने 43 चेंडूवर 59 धावा करून पुणेरी बाप्पा संघासाठी सर्वोत्तम योगदान दिले. कर्णधार यश क्षीरसागर याने 18 चेंडूवर 31 व ऋषिकेश सोनवणेने 13 चेंडूंमध्ये वीस धावा बनवल्या. संघ विजयाकडे आगेकूच करत असताना त्यांचे 12 धावात 3 बळी गेले. अखेर, 10 चेंडू 10 धावा असे समीकरण आले असताना, पुणे संघाने एक चेंडू राखून विजय मिळवला. सचिन भोसले याला सामनावीर ठरवले गेले.

पुणेरी बाप्पा 9 सामन्यात 11 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर, रत्नागिरी जेट्स यांचे 9 सामन्यात आठ गुण आहेत. रत्नागिरी जेट्सला प्ले ऑफ्ससाठी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून, इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागेल. आतापर्यंत केवळ ईगल नाशिक टायटन्स हेच प्ले ऑफ्समध्ये जागा बनवण्यात यशस्वी ठरले आहेत.

Comments are closed.