कायद्याचा धाक संपला, न्यायालयाबाहेर आरोपीवर गोळीबार, कोयत्याने हात कापले! पुण्याची पुरती वाट लागलीय
शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत असल्याची टिमकी वाजवणाऱया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नाकावर टिच्चून कोयताधारी टोळक्याने आज न्यायालयाबाहेर कायद्याचे धिंडवडे उडवले असून, पुण्याची पुरती वाट लागल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. खुनाच्या गुह्यात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीवर टोळक्याने बेछूट गोळीबार करत पाठलाग करून चॉपर आणि कोयत्याने सपासप वार केले. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने टोळक्याने पळवून 10 ते 15 वार करीत हाताचे पंजे तोडले. दिवसाढवळ्या गजबजलेल्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर परिसरात हा रक्तरंजित थरार पाहून अनेकांनी धास्ती घेतली. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांना दौंड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंदार मारुती किवळे (वय 35, रा. कात्रज, नवीन वसाहत) असे गंभीररीत्या जखमी झालेल्याचे नाव आहे. तो 18 नोव्हेंबरला खुनाच्या गुह्यातून जामिनावर जेलबाहेर आला होता. हल्ल्याची घटना बुधवारी (दि. 25) दुपारी एकच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाहून दोन पिस्तूल जप्त केली आहेत. आरोपींच्या शोधार्थ गुन्हे शाखेची पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. दरम्यान, भरदुपारी टोळक्याने तरुणावर सपासप वार करीत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खुनातील आरोपी जेलबाहेर आल्यानंतर त्याच्यावर एवढय़ा गंभीर स्वरूपात हल्ला होईल, याचे इंटेलिजन्स गोळा करण्यात पुणे पोलीस कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंदार किवळे हा कात्रजमधील संतोषनगरात एप्रिल 2025 मध्ये झालेल्या खुनातील आरोपी असून, तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर, बुधवारी तो दुपारी पावणेएकच्या सुमारास न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात जात होता. त्याचवेळी मेट्रो स्टेशन परिसरात दोन दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मंदारला गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी चुकल्यानंतर टोळक्याने त्याच्यावर चॉपर, कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातून जाणाऱया नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. आरडाओरड, कोयत्यांच्या सपासप आवाजाने परिसरातील वकिलांसह नागरिकांनी धाव घेतली. त्यावेळी 5 जणांचे टोळके धारदार शस्त्राने मंदारवर वार करत होते. टोळक्याने मंदारच्या दोन्ही मनगटावर वर्मी घाव घातले. त्यामुळे दोन्ही हातांचे पंजे मनगटापासून वेगळे होऊन कातडीला चिकटल्याचे दिसून आले. हल्ल्यानंतर दोन दुचाकीवर टोळके कोयते नाचवित ‘आम्ही कात्रजचे भाई, आमच्या नादाला कोणी लागू नका’ म्हणत परिसरातून पसार झाले.
कोयताधाऱ्यांच्या दहशतीने वकील, नागरिकांमध्ये थरकाप
टोळक्याने कोयत्याने वर्मी घाव घालून मंदारला गंभीर जखमी केले. प्रत्येक घावातून रक्ताचे पाट, चिळकांड्या उडत होत्या. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांसह वकिलांचा थरकाप उडाला. जखमी मंदार मदतीसाठी याचना करत होता. मात्र, टोळक्याच्या धास्तीमुळे त्याला मदतीसाठी कोणीही धावले नाही. हल्लेखोर पसार झाल्यानंतर मंदार स्वतŠ उठून 10 ते 12 मीटर अंतर चालला. मात्र, त्यानंतर त्याला भोवळ आल्यानंतर तो जागेवरच कोसळला. दरम्यान, खुनी हल्ल्याची माहिती मिळताच, न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले.
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेल्या यापूर्वीच्या घटना
कुख्यात गुंड बाळकृष्ण ऊर्फ बाळू आंदेकर याच्यावर माळवदकर टोळीने वार करून खून केल्याची घटना शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात घडली होती. तसेच कुख्यात अप्पा लोंढे टाळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडावर गोळीबार केल्याची घटना न्यायालय परिसराबाहेर घडली होती. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरातही आता कायदा-सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका केली जात आहे.
न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढविण्याची मागणी
शिवाजीनगर न्यायालाच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्याचे दोन प्रकार महिनाभरात घडले. त्यानंतर आज न्यायालयासमोर गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर असलेल्या आपल्या पुण्याची ओळख गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे. शिकाजीनगर न्यायालयासमोर झालेला एकावर कोयत्याने वार करून गोळीबाराच्या घटनेनंतर पुणेकरांच्या आणि एकंदरित शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. – सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
भरदिवसा न्यायालयाच्या परिसरात एकावर गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याच्या घटनेमुळे परिसरात कडक बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे पुणे बार असोसिएशनकडून पाठपुरावा केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. – सम्राट जांभुळकर, सचिव, पुणे बार असोसिएशन.
हल्लाप्रकरण गुह्यातील 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडे तपास सुरू आहे. पोलिसांनी जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले; तसेच आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. न्यायालयातील सुरक्षितता वाढवण्यासंदर्भात ऑडिट करण्यात आले आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.
मित्राच्या खुनाचा वचपा
घरालगतच्या जमिनीच्या वादातून टोळक्याने 20 एप्रिल 2025 रोजी शुभम संतोष चव्हाण (रा. संतोषनगर, कात्रज) याचा खून केला होता. त्यामध्ये सराईत अमर दिलीप साकोरे, मंदार मारुती किवळे, गिरीश सुभाष वावरे, योगेश बाबूराव डोरे यांचा समावेश होता. संबंधित गुह्यातील आरोपी मंदार किवळे याला 18 नोव्हेंबरला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून टोळक्याने त्याच्यावर पाळत ठेवली होती.
Comments are closed.