IPL 2026: पंजाब किंग्ज जोमात… लखनऊ कोमात! पीबीकेएसने एलएसजीचा 54 धावांनी उडवला धुव्वा!
आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सची विजयी मालिका अविरत सुरू आहे. यंदाच्या हंगामातील 29 व्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करत, पंजाबने लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह, या हंगामात आपला पाचवा विजय नोंदवणारा पंजाब हा पहिलाच संघ ठरला आहे. गुणतालिकेत आधीच अव्वल स्थान पटकावून बसलेल्या पंजाबचे, या पाचव्या विजयामुळे ‘नंबर वन’ स्थानावरील वर्चस्व आता आणखीच मजबूत झाले आहे.
मुल्लनपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्सने 7 गड्यांच्या मोबदल्यात 254 धावांची विशाल धावसंख्या उभारली. पंजाबकडून कूपर कॉनली आणि प्रियांश आर्य यांनी स्फोटक खेळी केली; कूपरने 87 धावा केल्या, तर प्रियांशने 93 धावांचे योगदान दिले. लखनऊच्या बाजूने, प्रिन्स यादव आणि एम. सिद्धार्थ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवण्यात यश मिळवले.
पंजाब किंग्सच्या या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना, लखनऊने आपल्या डावाची सुरुवात दमदार केली. आयुष बडोनी आणि मिचेल मार्श यांनी मिळून पॉवरप्लेच्या षटकांमध्ये 61 धावा कुटल्या. मात्र, सहाव्या षटकाच्या अगदी शेवटच्या चेंडूवर आयुष बदोनी तंबूत परतला. त्यानंतर, मिचेल मार्श 40 धावा काढून बाद झाला. 11.1 षटकांच्या समाप्तीपर्यंत, धावसंख्या 109 धावांवर असतानाच, लखनऊने आपले दोन फलंदाज गमावले होते. या टप्प्यावर धावगती वाढवणे अत्यंत गरजेचे होते;. परंतु, एलएसजीचा डाव गडगडला आणि 139 धावांच्या एकूण धावसंख्येवर त्यांनी आपले चार गडी गमावले. अखेरीस, एडन मार्करम आणि मुकुल चौधरी यांनी धावगती वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र, 20 षटके पूर्ण होईपर्यंत पंतच्या संघाला 5 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा प्रकारे, पंजाब संघाने 54 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
Comments are closed.