PBKS vs SRH: आयपीएलमध्ये 200+ धावांचा पाठलाग करण्यात पंजाब किंग्ज 'किंग'; इतर कोणताही संघ आसपासही नाही!

आयपीएल 2026 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा (PBKS vs SRH) एकतर्फी पराभव केला. 220 धावांचे मोठे आव्हान पंजाबने 18.5 षटकातच 4 गडी राखून पूर्ण केले. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबने हा विजय साकारला. या विजयासोबतच पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

आयपीएलच्या इतिहासात 10 वेळा 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा पंजाब किंग्ज हा पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला 10 वेळा असा पराक्रम करता आलेला नाही. या यादीत मुंबई इंडियन्स 6 वेळा असा विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL मध्ये सर्वाधिक वेळा 200+ धावांचे लक्ष्य गाठणारे संघ

10 – पंजाब किंग्ज
6 – मुंबई इंडियन्स
5 – राजस्थान रॉयल्स
4 – सनरायझर्स हैदराबाद
4 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा हा विजय पंजाबच्या आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा ‘रन चेज’ आहे. पंजाबने आपला सर्वात मोठा विजय 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 262 धावांचा पाठलाग करून मिळवला होता. तर याच वर्षी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 210 धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.

220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह यांनी पंजाबला 99 धावांची सलामी दिली. प्रियांश आर्याने 20 चेंडूत 57 धावा करत त्यात 5 चौकार, 5 षटकार झळकावले. तर प्रभसिमरन सिंगने 25 चेंडूत 51 धावा 4 चौकार, 4 षटकार झळकावले तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर येत 33 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

Comments are closed.