CSK vs PBKS: धोनीशिवाय चेन्नईचा सलग दुसरा पराभव! पंजाब किंग्सचा चेपॉकवर 5 विकेट्सने दमदार विजय
चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs PBKS) 5 विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात पंजाबने 19 व्या षटकातच लक्ष्य गाठून आपला सलग दुसरा विजय नोंदवला. पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 50 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली.
टॉस गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. चेन्नईसाठी सर्वाधिक आयुष म्हात्रेने (Ayush mhatre) 73 धावा केल्या, तर सरफराज खानने तुफानी फलंदाजी करत 32 धावांची छोटी पण प्रभावी खेळी केली. तसेच शिवम दुबे 45 धावा करून नाबाद राहिला. त्यांच्या योगदानामुळे चेन्नईचा संघ 209 धावांपर्यंत पोहोचू शकला.
प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंह यांनी पंजाब किंग्सला वेगवान आणि शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून केवळ 4.2 षटकांत 61 धावा ठोकल्या होत्या. प्रियांशने 11 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली, तर प्रभसिमरन संयमी फलंदाजी करत 43 धावांवर पोहोचला होता, मात्र तो दुर्दैवीरित्या धावबाद (Run out) झाला. त्यानंतर कूपर कॉनोलीने येऊन 22 चेंडूत 36 धावा करत धावफलक वेगाने पुढे नेला. पण सर्वात मोठी खेळी कर्णधार श्रेयस अय्यरने केली. शेवटच्या 10 षटकांत पंजाबला विजयासाठी 107 धावांची गरज होती, पण येथून श्रेयस अय्यरने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 29 चेंडूत 50 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार लगावले.
एमएस धोनी (MS Dhoni) दुखापतीमुळे राजस्थान पाठोपाठ पंजाब विरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नाही. धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सने चेन्नईला 7 गड्यांनी हरवले होते. आता पंजाबने चेन्नईचा 5 गड्यांनी पराभव केला आहे. चेन्नई सध्या गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
Comments are closed.