पंजाब उपांत्य फेरीत, दिल्लीला नमवत विदर्भही अंतिम चार संघांत

फलंदाजांच्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर पंजाबने मध्य प्रदेशचा तब्बल 183 धावांनी पराभव करत विजय हजारे करंडकाच्या उपांत्य फेरीत धूमधडाक्यात प्रवेश केला. तसेच दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भने दिल्लीचा 74 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

पहिल्या लढतीत पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 345 धावांचा डोंगर उभारला आणि सामना एकतर्फी केला. कर्णधार प्रभसिमरन सिंगने 88 धावांची संयमी खेळी केली. त्याला अनमोलप्रीत सिंग (70), नेहाल वढेरा (56) आणि हरनूर सिंग (51) यांनी भक्कम साथ दिली. वढेरा-अनमोलप्रीत जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेली 76 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशची फलंदाजी कोलमडली. अवघ्या 31.2 षटकांत 162 धावांवर संपूर्ण संघ गारद झाला.

तसेच  विदर्भने यश राठोडच्या झंझावाती 82, अथर्व तायडे (62), ध्रुव शोरी (49) यांच्या खेळीच्या जोरावर विदर्भने 9 बाद 300 धावा केल्या. तर दिल्लीचा डाव 224 धावांत आटोपला.

Comments are closed.