राष्ट्रपतींच्या हस्ते पुतिन यांचा गौरव

शाही स्नेहभोजनाचे आयोजन, मान्यवरही उपस्थित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा प्रथेप्रमाणे सन्मान केला आहे. शुक्रवारी सकाळी अध्यक्ष पुतीन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती राधाकृष्णन, अनेक केंद्रीय मंत्री आणि भारतातील मान्यवर उद्योगपतींचा सहभाग लाभला होता. अध्यक्ष पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांनी शाही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केलेले होते.

या कार्यक्रमानतंर बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात दोन्ही देशांचे व्यापार प्रतिनिधी समाविष्ट झाले होते. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य कसे वाढविता येईल, यावर या कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आले. औद्योगिक सहकार्य वाढविण्यासमवेत व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रातही सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ई-पर्यटन व्हिसा उपलब्ध होणार

रशियाच्या नागरीकांना भारतात पर्यटनास येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करीता भारत रशियाच्या पर्यटकांना 30 दिवसांचा ई&-व्हिसा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे रशियन पर्यटकांना जटील व्हिसा प्रक्रिया टाळून सहजगत्या भारतात प्रवेश करता येईल आणि भारतात संचार करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सांस्कृतिक पर्यटनात वाढ व्हावी, यासाठी विशेष योजना आहे.

कल्पाक्कमच्या अणुभट्टीला इंधन पुरवठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या शिखर परिषद काळातच रशियाच्या कंपनीने भारताच्या कल्पाक्कम येथील अणुऊर्जा केंद्राला अणुइंधन पुरविण्याचा निर्णय घोषित केला आहे. अणुवीजेच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ‘युरेनियम-235’ या खनिजाचा पुरवठा रशियाकडून केला जाणार आहे. रशिया भारताला छोट्या अणुभट्ट्या निर्माण करण्यासाठी साहाय्यही करणार आहे. दोन्ही देशांनी अणुसहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलपुरवठा अखंड राहणार

रशिया भारताला अखंडपणे कच्च्या इंधन तेलाचा पुरवठा करीत राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष पुतीन यांनी केले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याने अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. तसेच रशियाच्या काही महत्वाच्या तेल विक्री कंपन्यांवर कठोर व्यापार निर्बंधही लागू केले आहेत. तरीही भारताने रशियाकडून शक्य तितके तेल खरेदी करण्याचे ठरविले आहे. या विषयावरही दोन्ही नेत्यांच्या शिखर परिषदेत सविस्तर चर्चा केली गेली.

Comments are closed.