आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर, व्लादिमीर पुतिन यांचे इराणला मोठे आश्वासन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेऊन इराणला आपला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, या महत्त्वपूर्ण भेटीत पुतिन यांनी शब्द दिला आहे की, रशिया प्रत्येक ते काम करेल जे इराण आणि या क्षेत्रातील इतर देशांच्या हिताचे असेल.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि इस्लामाबादमधील शांतता चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सामान्यतः परराष्ट्र मंत्री हे दुसऱ्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतात. मात्र पुतिन यांनी स्वतः अराघची यांच्याशी चर्चा केली. यावरून रशिया इराणसोबतच्या संबंधांना किती मोठे प्राधान्य देत आहे, हे स्पष्ट झाले आहे. या भेटीनंतर अराघची यांनी पुतिन यांचे आभार मानले असून दोन्ही देशांमधील मैत्री अधिक घट्ट होईल, असे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी म्हटले की, त्यांना इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याकडून एक विशेष संदेश मिळाला आहे. पुतिन यांनी अराघची यांच्यामार्फत खामेनी यांना आपल्या शुभेच्छा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना पोहोचवण्यास सांगितले आहे. दोन्ही देशांमधील सर्वोच्च स्तरावरील हा संवाद रशिया आणि इराणमधील वाढती जवळीक अधोरेखित करतो.
दरम्यान, या भेटीमुळे जागतिक राजकारणात मोठा संदेश गेला आहे की, इराण या संघर्षात एकटा नाही. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधात रशिया उघडपणे इराणच्या बाजूने उभा ठाकला आहे. यामुळे इराणचा आत्मविश्वास वाढला असून, वाटाघाटींमध्ये इराणची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
Comments are closed.