पुतिन यांचं सर्वात घातक अस्त्र; १८ हजार किमी पल्ला असलेल्या ‘सरमत’मुळे जगात धडकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगाला पुन्हा एकदा आपल्या लष्करी सामर्थ्याचा इशारा दिला आहे. रशियाचे सर्वात प्रगत आणि विनाशकारी अण्वस्त्र ‘आरएस-२८ सरमत’ (RS-28 Sarmat), ज्याला पाश्चात्य देश ‘सॅटन-२’ (Satan-II) म्हणून ओळखतात आता प्रत्यक्ष तैनातीसाठी सज्ज झाले आहे. १८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राने अमेरिका आणि नाटो (NATO) देशांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

‘सरमत’ हे केवळ क्षेपणास्त्र नसून ते रशियाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड मानले जात आहे. हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) एकाच वेळी १० ते १५ अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. याचा अर्थ, एकाच प्रक्षेपणाद्वारे अनेक शहरांना किंवा लष्करी तळांना एकाच वेळी लक्ष्य केले जाऊ शकते. रशियन संरक्षण तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, हे क्षेपणास्त्र उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरून प्रवास करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकते. ज्यामुळे शत्रूच्या सध्याच्या रडार आणि संरक्षण यंत्रणांना त्याला शोधणे किंवा रोखणे जवळपास अशक्य आहे.

पुतिन यांनी यापूर्वीच म्हटले होते की, सरमतची निर्मिती रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना विचार करायला भाग पाडण्यासाठी केली गेली आहे. हे क्षेपणास्त्र इतक्या वेगवान गतीने लक्ष्याकडे झेपावते की, जगातील कोणतीही आधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली याला हवेत नष्ट करू शकत नाही. युक्रेनमधील संघर्षात पाश्चात्य देशांचा हस्तक्षेप वाढत असताना, रशियाने हे अस्त्र तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्याने जागतिक स्तरावर अण्वस्त्र युद्धाची भीती पुन्हा एकदा गडद झाली आहे.

Comments are closed.