Israel Iran War – युद्धामुळे कतार होरपळला; अमेरिकेने फायदा कमावला

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता वाढत असतानाच जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच इराणने कतारच्या एलएनजी प्लांटवर मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे या युद्धाशी थेट संबंध नसतानाही कतारला मोठेनुकसान सहन करावे लागले आहे. या युद्धामुळे कतार होरपळला असून अमेरिकाचा जबरदस्त फायदा झाला आहे.

या हल्ल्याबाबत कतार एनर्जीच्या सीईओने खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले हा एक मोठा हल्ला होता, असे व्हायला नको होते. आमचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे कतार एनर्जीच्या सीईओ साद शेरिदा अल-काबी यांनी सांगत आपले दुःख केले. त्यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्यामुळे कतारचे एलएनजी क्षेत्र खिळखिळे झाले असून, जागतिक ऊर्जा संकटाचा धोका वाढला आहे. कतारच्या एलएनजी उत्पादन क्षमतेपैकी अंदाजे १७% क्षमतेवर परिणाम झाला असून, हा जगाच्या गॅस पुरवठ्याला एक मोठा धक्का आहे. इराणच्या हल्ल्यामुळे कतारमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे.

नुकसान इतके गंभीर आहे की पूर्णपणे सावरण्यासाठी तीन ते पाच वर्षे लागू शकतात. या हल्ल्यामुळे एलएनजी उत्पादनातील सर्वात महत्त्वाचे युनिट्स असलेल्या लिक्विफॅक्शन ट्रेन्सचे मोठे नुकसान झाले आहे. गॅस-टू-लिक्विड्स (GTL) प्लांटचेही नुकसान झाले असून, त्यामुळे देशाला अब्जावधी डॉलर्सचे वार्षिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

इराणच्या अचानक झालेल्या हल्ल्याचा कतारच्या प्रमुख गॅस केंद्र, रास लाफान औद्योगिक शहराच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. यामुळे दरवर्षी अंदाजे १२-१३ दशलक्ष टन एलएनजीचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ज्यामुळे आशिया आणि युरोपमधील अनेक देशांवर परिणाम होईल.

अल-काबी यांनी असेही स्पष्ट केले की, हल्ल्यानंतर कंपनीला आता अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये ‘फोर्स मॅज्युर’ (अपरिहार्य परिस्थिती) कलमे लागू करावी लागली आहेत, याचा अर्थ ती नियोजित वितरण पूर्ण करू शकणार नाही. यामुळे, कंपनीला अनेक दीर्घकालीन करार स्थगित करावे लागले आहेत. या हल्ल्यामुळे कतारच्या एलएनजी निर्यात क्षमतेपैकी अंदाजे १७% क्षमता नष्ट झाली. ते म्हणाले, माझ्या मते, हे नुकसान खूप मोठे आहे आणि पूर्णपणे सावरण्यासाठी तीन ते पाच वर्षे लागू शकतात.

त्यांनी स्पष्ट केले की, एलएनजी रिफायनरीवरील हल्ल्यामुळे देशाला दरवर्षी मोठे नुकसान होईल. हे नुकसान वार्षिक सुमारे २० अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. सीईओंच्या मते, हे नुकसान कल्पनेपलीकडचे आहे. तथापि, या हल्ल्यानंतरही त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि सांगितले की कतार या युद्धात सामील नाही, आणि म्हणूनच तेल आणि वायू पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ नये.

कतारचा एलएनजी प्रकल्प प्रामुख्याने चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, यूके आणि इटलीसह आशिया आणि युरोपला पुरवठा करतो. या प्लांटमधून होणारी एलएनजी निर्यात प्रामुख्याने दीर्घकालीन करारांद्वारे होते, कारण कतार एनर्जी ही जगातील अव्वल एलएनजी कंपन्यांपैकी एक आहे.

या हल्ल्यामुळे कतारच्या एलएनजी निर्यात क्षमतेपैकी सुमारे १७% क्षमता नष्ट झाली आहे आणि हा संपूर्ण व्यवसाय अमेरिकेकडे हस्तांतरित होईल. कतार व्यतिरिक्त, अमेरिकन एलएनजी कंपन्या देखील दीर्घकालीन करारांवर कार्यरत आहेत. कतारच्या एलएनजी सुविधेवरील मोठ्या हल्ल्यानंतर अमेरिकेने एक निवेदन जारी केले आहे. इस्रायलने सुरुवातीला इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारच्या एलएनजी प्लांटवर क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलने इराणच्या तेल सुविधेवरील हल्ल्याबद्दल माहिती दिली नव्हती आणि भविष्यात ते तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य करणार नाहीत, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

याचा अर्थ असा की इस्रायलने अमेरिकेला माहिती न देता इराणच्या रिफायनरीवर हल्ला केला. या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यामुळे कतारला आता मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तथापि, कतारवरील हल्ल्यामुळे अमेरिकेला सर्वाधिक आर्थिक फायदा होणार आहे, कारण कतारसोबतचे सर्व रद्द झालेले करार आता अमेरिकन कंपन्यांना मिळतील. त्यामुळे या युद्धात कतार होरपळला असला तरीही अमेरिकेने मोठा फायदा कमावला आहे.

Comments are closed.