क्वीन डिफेंडर्सने पटकावले गटविजेतेपद, रायसोनी स्मृती सांघिक बुद्धिबळ स्पर्धा

जीएच रायसोनी स्मृती सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत 10 वर्षांखालील गटात क्वीन्स डिफेंडर्स, 12 वर्षांखालील गटात एंडगेम किंग्ज, 14 वर्षांखालील गटात पह्र किंग्ज, 8 वर्षांखालील गटात पह्र फिशर नाइट्स या संघांनी बाजी मारली तर खुल्या गटात शूरवीर संघ सात नॉनस्टॉप विजयांसह विजेता ठरला.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रायसोनी मेमोरियल, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाऊंडेशन आणि चेस एक्सलंस संस्थेच्या वतीने आयोजित या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत 4 खेळाडूंचा समावेश असलेल्या 67 संघांनी सहभाग नोंदवला होता. यात 8 ते 14 वर्षांखालील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. 10 वर्षांखालील गटात क्वीन्स डिफेंडर्सच्या खेळाडूंनी सातपैकी पाच सामने जिंकत जोरदार खेळ केला. 12 वर्षांखालील गटात एंडगेम किंग्ज आणि पह्र फिशर नाइट्स संघांनीही चार-चार विजयांची नोंद केली.
खुल्या गटात अर्णव खेडेकर, ओम गाडा, दक्ष जगेसिया आणि रचित गुरनानी यांच्या शूरवीर संघाने सर्वच्या सर्व सात सामने जिंकण्याचा पराक्रम करत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर टर्मिनेटर बॉइज अ, द चेकमेट वॉरिअर्स आणि शाडो किंग्ज या संघांनी प्रत्येकी सहा सामने जिंकत दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान संपादले. या अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वामन हरी पेठे ज्वेलर्सचे मालक नील पेठे, बुद्धिबळप्रेमी जयसिंग भिलारे, बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भिलारे आणि सचिव राजाबाबू गजेनगी यांच्या उपस्थितीत पार पडला.

Comments are closed.