टी-20 वर्ल्ड कप कुणीही पाहणार नाही, अश्विनचे अस्वस्थ करणारे भाकित

वाढती स्पर्धा, दर्जा नसूनही वाढणारे संघ. त्याचवेळी ढासळत चाललेला दर्जा यामुळे पुढच्या महिन्यात हिंदुस्थानश्रीलंकेत होणारा टी-20 वर्ल्ड कप कुणीही पाहणार नाही. हे धक्कादायक विधान केलेय मैदानावर फिरकी गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांची झोप उडवणाऱया रविचंद्रन अश्विनने. आता त्याने चेंडूऐवजी शब्दांची फिरकी टाकत क्रिकेटच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे केलेय आणि त्याचवेळी त्याने आयसीसीसाठी इव्हेंट आणि शोबाजी होत चाललेल्या टी-20 वर्ल्ड कपवर आपले रोखठोक मत व्यक्त केलेय.

आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर बोलताना अश्विनने हिंदुस्थान विरुद्ध अमेरिका किंवा हिंदुस्थान विरुद्ध नामीबिया हे सामने वर्ल्ड कपचे की सराव सामन्यांचे? असा सवाल करत आयसीसीच्या आयोजन धोरणावर बोट ठेवलेय. पूर्वी वर्ल्ड कप चार वर्षांतून एकदा यायचा. त्यामुळे त्याची आतुरतेने वाट पाहिली जायची. पहिल्याच फेरीत हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड, श्रीलंका असायचे. त्यात चुरस होती, थरार होता, मजा होती. मात्र आता सामने एकतर्फी होत चालले आहेत आणि प्रेक्षक दूर पळतोय, असा थेट टोलाही त्याने लगावलाय.

2026 चा टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. 20 संघ, पाच गट आणि प्रचंड सामने. कागदावर भव्य वाटणारी ही मांडणी मैदानावर मात्र सपक ठरण्याची भीती अश्विनने व्यक्त केलीय. गतविजेता असलेला हिंदुस्थान पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध उतरणार आहे. हा सामना जिंकण्याचा उत्साह मोठा असेल का? हे खरंच वर्ल्ड कपचं मैदान आहे का? असा प्रश्न मनात येईल, असेही तो म्हणाला. वर्ल्ड कपचा कार्यक्रम पाहता साखळीतील बहुतांश लढती एकतर्फी रंगण्याची शक्यता असल्यामुळे त्या लढतींना मैदानेही रिकामे राहण्याची दाट शक्यता आहे.

अश्विन आज केवळ माजी गोलंदाज म्हणून बोलत नाही, तर एक सजग क्रिकेटरसिक म्हणून अस्वस्थ होत बोलतोय. फिरकीने फलंदाजांना गुंडाळणारा हा माणूस आता शब्दांनी व्यवस्थेची विकेट काढायच्या तयारीत आहे. पण त्याचे आयसीसी ऐकणार का? की पुन्हा एकदा वर्ल्ड कप हा फक्त पॅलेंडरवरील एक ‘इव्हेंट’ बनून राहणार? हा प्रश्न कायम आहे.

Comments are closed.