टी-20 वर्ल्डकप पाहण्यासाठी मैदानात कोणीही येणार नाही…; अश्विनचं खळबळजनक भाकीत, ICC च्या प्लॅन

T20 विश्वचषक 2026 वर आर अश्विन: आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026चा थरार पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू होणार आहे. यासाठी जवळपास सर्वच संघांनी आपापले स्क्वाड जाहीर केले आहेत. मात्र, या स्पर्धेआधीच माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयसीसीच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना धक्कादायक विधान केले आहे. यावेळी तो म्हणाला, “यावेळी होणारा टी20 वर्ल्डकप पाहायला कोणीच जाणार नाही.” टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांना पाच गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप A मध्ये असून या गटात भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे.

आयसीसीच्या प्लॅनिंगवर अश्विनची टीका

रविचंद्रन अश्विन म्हणाला की, “भारत-अमेरिका किंवा भारत-नामीबिया असे सामने तुम्हाला संपूर्ण स्पर्धेपासून दूर नेतील. 1996, 1999 आणि 2003 च्या विश्वचषकावेळी मी शाळेत होतो. तेव्हा वर्ल्डकप म्हणजे खास असायचा. आम्ही त्याचे शेड्युल कार्ड जपून ठेवायचो, कारण वर्ल्डकप चार वर्षांतून एकदाच यायचा. पण आता सगळंच बदललं आहे.”

कमकुवत संघांमुळे स्पर्धा कंटाळवाणी ठरणार?

अश्विनच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात भारताचा सामना अमेरिका किंवा नामीबिया सारख्या संघांशी झाल्यास चाहत्यांमध्ये अपेक्षित उत्साह निर्माण होणार नाही. तो पुढे म्हणाला, “जर पहिल्याच फेरीत भारताची लढत इंग्लंड किंवा श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघांशी झाली असती, तर स्पर्धेचा थरार सुरुवातीपासूनच वाढला असता. पण यावेळी सुपर-8 टप्प्यापर्यंत येईपर्यंत वातावरण थंड पडेल.”

वनडे क्रिकेटच्या भवितव्यावरही चिंता

टी20 वर्ल्ड कपव्यतिरिक्त अश्विनने वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या मते, 2027 च्या वनडे विश्वचषकानंतर आयसीसीला या फॉरमॅटबाबत गंभीर विचार करावा लागू शकतो. तो म्हणाला, “क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर टी20 कडे वळले आहेत. कसोटी क्रिकेटकडे काही प्रमाणात रस वाढताना दिसतोय, पण तो किती लोकांपर्यंत पोहोचतोय, हे सांगता येत नाही. खरी चिंता वनडे क्रिकेटची आहे, हा फॉरमॅट कुठे आपले अस्तित्व गमावणार तर नाही ना?”

हे ही वाचा –

कधी सचिन तेंडुलकरलाही घाम फोडणारा गोलंदाज… आज शाळेत-लग्नात गाणी म्हणत कुटुंबाचा गाडा ओढतोय; कोण तो क्रिकेटर?

आणखी वाचा

Comments are closed.