Ashes 2025 – खेळपट्टीवरून ‘डबल ढोलकी’ वाजवणाऱ्यांना अश्विनने बदडून काढले, पर्थचा दिला दाखला

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात पर्थ येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तब्बल 19 विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने 172 धावांमध्ये गुंडाळले. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने सात विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर देत दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 123 अशी बिकट केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 5 घेतल्या. यानंतर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्याने खेळपट्टीवरून डबल ढोलकी वाजवणाऱ्यांवर निशाणा साधला.

अश्विनने आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत पर्थवर दिवसभरात फक्त 19 विकेट्स पडल्याचे म्हटले. जर असेचहिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकेत गुवाहाटी येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत घडले तर काय होईल? असा सवाल करत खेळपट्टीवरून डबल ढोलकी वाजवणाऱ्यांचा समाचार घेतला.

हिंदुस्थानमधील फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर एका दिवसात 15-16 विकेट्स पडल्या तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू खेळपट्टीवर खापर फोडतात. हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकेत कोलकाता येथे खेळल्या गेलेला पहिला कसोटी सामना अडीच दिवसांमध्येच संपला होता.

दुसऱ्या दिवशी ईडन गार्डन्सवर तब्बल 17 विकेट्स पडल्या होत्या. यानंतर तज्ज्ञांनी प्रचंड टीका केली होती. मात्र आता पर्थमध्येही उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर 19 विकेट्स पडल्या. याचे श्रेय मात्र ते गोलंदाजांना देतात. याचाच आर. अश्विन याने समाचार घेत त्यांना झोडून काढले.

Comments are closed.