आरके सिंह भाजपमधून निलंबित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंग यांना पक्षाने निलंबित केले आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सिंग हे दिवंगत नेते मनमोहनसिंग यांच्या काळात गृहविभागाचे सचिवही होते. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना त्यांनी बिहार सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तसेच, पक्षाचे एक उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे, तसेच काही व्यक्तीगत आरोपही केले होते. त्यांनी हेतुपुरस्सर भारतीय जनता पक्षाशी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे, असे पक्षाने स्पष्ट केले.
बिहारची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर त्वरित सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करुन त्यांनच पाडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतरही अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर पक्षाने कारवाईचे शस्त्र उगारले आहे काही नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधातही कठोर कारवाई करुन पक्षात अनुशासन बळकट केले जाईल, असे पक्षाने शनिवारी स्पष्ट केले.
Comments are closed.