अवघ्या 4 हजार शेतकऱ्यांनी घेतले विमा संरक्षण, 15 डिसेंबरअखेर विमा उतरवता येणार

यंदा जिह्यात दुष्काळी स्थितीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. आता नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा सुरू असून, आत्तापर्यंत जिह्यात अवघ्या 4 हजार 261 शेतकऱयांनी रब्बी हंगाम पीकविमा योजनेत 8 हजार 252 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाद्वारे शेतकऱयांनी 21 कोटी 60 लाख 58 हजार रुपयांचे विमा कवच घेतले आहे. ज्वारी पिकासाठी नोव्हेंबरअखेर, तर गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबरअखेर विमा उतरवता येणार आहे. दरम्यान, दुष्काळामुळे पेरण्या घटल्यामुळे रब्बी हंगामातील पीकविमादेखील घटल्याचे चित्र आहे.

यंदा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील जवळपास 80 ते 90 टक्के पिके वाया गेली आहेत. यामुळे यंदाच्या खरिपाला आता पीकविमा हा एकमेव आधार ठरणार आहे. यंदाचा पीकविमा हा प्रामुख्याने पीककापणी प्रयोगावर मंजूर करण्यात येणार आहे. जिह्यातील सर्वच तालुक्यांत खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन हे 50 ते 90 टक्क्यांपर्यंत घटल्याचे समोर आले आहे. जिह्यातील पीककापणी प्रयोगाचा निष्कर्ष आणि अहवाल पीकविमा कंपन्यांना सादर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात मूग, उडीद, सोयाबीन आणि बाजरी या पिकांचा विमा मंजूर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे दुष्काळ आणि सिंचनाची सोय नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्या असून, आत्तापर्यंत सरासरीच्या अवघ्या 25 टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. आता पेरणी झालेल्या क्षेत्रात फारशी वाढ होणार नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती, अशा शेतकऱयांनी गहू, हरभरा, मका आणि कांदा यांसह काही प्रमाणात चारा पिकांची लागवड केली आहे. यातील 4 हजार 261 शेतकऱयांनी 8 हजार 252 अर्जांद्वारे रब्बी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे. या पीक विमा योजनेत 4 हजार 889 हेक्टरमधील पिकांना 21 कोटी 60 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

गव्हाला हेक्टरी 45 हजार; ज्वारी, हरभऱयाला 36 हजार

रब्बी पीक विमा योजनेत बागायती गव्हाला हेक्टरी 45 हजार, बागायती ज्वारीला आणि हरभरा पिकाला प्रत्येकी हेक्टरी 36 हजार, उन्हाळी भुईमूग पिकाला 40,600 रुपये आणि रब्बी कांद्याला 95 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी शेतकऱयांना गव्हासाठी 900, ज्वारीसाठी 720, हरभरा 720 आणि उन्हाळी भुईमुगासाठी 812 रुपये आणि रब्बी कांदा पिकासाठी 1 हजार 425 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

कांद्याच्या बोगस विम्याकडे लक्ष

गेल्या वर्षात कांदा लागवड न करता अथवा कमी क्षेत्र लागवड करून अधिक क्षेत्र दाखवून कांदा पिकाचा विमा लाटल्याच्या घटना अहिल्यानगरसह पुणे, नाशिक व अन्य जिह्यांत घडलेल्या आहेत. हा प्रकार उघड झाल्यापासून कृषी विभागासह पीकविमा कंपन्यांनी विशेष करून कांदा लागवड आणि पीकविमा यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. यंदादेखील कृषी विभाग बोगस कांदा पीकविम्यावर लक्ष ठेवणार आहे.

Comments are closed.