न्यूझीलंड मालिकेपूर्वी निवड समितीसाठी डोकेदुखी! एकाच दिवशी 3 खेळाडूंनी शतके ठोकल्याने निवडीत चुरस निर्माण
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. निवड समिती (Selectors) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टीम जाहीर करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी शुबमन गिलचे (Shubman gill) पुनरागमन निश्चित मानले जात असले, तरी श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण निवड समितीची खरी डोकेदुखी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या तीन फलंदाजांनी वाढवली आहे. बुधवारी या तिघांनीही शतके झळकावून वनडे टीमसाठी आपला दावा ठोकला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराजने (Ruturaj gaikwad) महाराष्ट्राकडून खेळताना 113 चेंडूत 124 धावांची स्फोटक खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार झळकावले आहेत.
पडिक्कल (Devdatta padikal) सध्या जबरदस्त लयीत आहे. पुडुचेरीविरुद्ध त्याने 113 धावा केल्या. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक आहे.
मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराजने (sarafaz khan) तर मैदानावर अक्षरशः महफिल लुटली. त्याने अवघ्या 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 75 चेंडूत 157 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 14 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. त्याने आपल्या खेळीतील 120 धावा तर केवळ बाउंड्रीजमधूनच काढल्या.
एकाच दिवशी या तिन्ही खेळाडूंनी शतके ठोकल्यामुळे वनडे टीममधील जागेसाठी स्पर्धा आता अधिक तीव्र झाली आहे. आता निवड समिती यापैकी कोणावर विश्वास दाखवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments are closed.