‘रडार इंटरसेप्टर’ बेदरकार ड्रायव्हिंगला लावणार चाप! उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ‘रडार इंटरसेप्टर वाहन’ हे रस्त्यांवरील बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी सज्ज झाले आहे. परिवहन विभागाने या अत्याधुनिक इंटरसेप्टर रडार वाहनांमध्ये लेझर गन आणि अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.
नियम मोडणाऱया वाहनचालकाला आता आरटीओ अधिकाऱयांनी थांबविण्याची आवश्यकता नाही. वाहनातील कॅमेरे आपोआप नियम उल्लंघन करणाऱयाचा फोटो काढतात आणि थेट मोबाइलवर ई-चलन पाठवले जाते. फेब्रुवारी आणि मार्च 2026 या दोन महिन्यांमध्ये महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱया 2 हजार 55 वाहनधारकांना ई-चलन जारी करण्यात आले आहेत, असे प्रसाद गाजरे यांनी सांगितले.
सांगली जिह्यातील सहा महामार्ग सांगली–पेठ महामार्ग, सांगली– मिरज महामार्ग, सांगली–अंकली महामार्ग, अंकली–नागज महामार्ग, आष्टा–पेठ वडगाव मार्ग, आष्टा–भिलवडी मार्ग या मार्गावरती रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित आहे. रडार इंटरसेप्टर वाहन हे तासाला 800 वाहनांवर लक्ष ठेवून ई-चलन जारी करू शकते. ही सिस्टीम अतिवेगासह लेन कटिंग, सीट बेल्ट, हेल्मेट नसणे, अशा गुह्यांचा पुरावा कॅप्चर करून संबंधित वाहनचालकाच्या व वाहनांवर चलन जारी करते.
वाहन चालवताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि कारचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. वाहन चालवताना फोनवर बोलणे टाळावे. वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करू नये, अशा सूचना देत परिवहन विभागाने सज्ज केलेल्या अत्याधुनिक रडार इंटरसेप्टरची नजर असून, वाहनधारकांनी नियम तोडू नये, असे आवाहन गाजरे यांनी केले आहे.
Comments are closed.