रशियाविरुद्धच्या युद्धासाठी युक्रेन हवाई शक्ती वाढवणार; फ्रान्ससोबत केला 100 राफेल विमानांचा करार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी फ्रान्समधील पॅरिसमध्ये एका ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. त्या करारानुसार युक्रेनला १०० राफेल लढाऊ विमाने मिळतील. वाढत्या रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान युक्रेनच्या दीर्घकालीन लष्करी क्षमता बळकट करण्याच्या प्रयत्नांचा हा करार आहे. झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करण्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचले होते. तिथे दोन्ही नेत्यांनी फ्रान्समधील व्हिलाकुब्ले लष्करी हवाई तळावर कराराला औपचारिक मान्यता दिली.
झेलेन्स्की यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत १०० राफेल विमानांची ऑर्डर दिल्याचे सांगितले. एलिसी पॅलेसनेही या माहितीची पुष्टी केली. ही विमाने फ्रान्सच्या सध्याच्या साठ्यातून येतील की युक्रेनकडून नवीन ऑर्डर म्हणून खरेदी केली जातील हे स्पष्ट झाले नाही. दोन्ही नेत्यांनी राफेल विमानांसमोर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. झेलेन्स्की यांनी सांगितले की फ्रान्ससोबत एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. त्यामुळे युक्रेनच्या लढाऊ विमान वाहतूक आणि हवाई संरक्षण क्षमतांना बळकट करेल. रशियाच्या आक्रमक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्स आणि युक्रेनमध्ये युक्रेनचे हवाई संरक्षण कसे आणखी मजबूत करता येईल यावर चर्चा सुरू आहे. मॅक्रॉनचे सरकार अंतर्गत राजकीय आणि अर्थसंकल्पीय आव्हानांना तोंड देत असले तरी, फ्रान्सने युक्रेनला नवीन लष्करी मदत देण्याचे वचन दिले आहे. फ्रान्सने आधीच मिराज लढाऊ विमाने आणि एस्टर-३० क्षेपणास्त्रे पुरवण्याची घोषणा केली आहे.
राफेल करार हा 10 वर्षांच्या धोरणात्मक विमान वाहतूक भागीदारीचा भाग मानला जातो. काही विमाने फ्रान्सच्या सध्याच्य ताफ्यातून पुरवली जाऊ शकतात, तर उर्वरित विमाने दीर्घ कालावधीत तयार केली जातील. युक्रेनचे एकूण हवाई दल २५० लढाऊ विमानांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यात अमेरिकन एफ-१६ आणि स्वीडिश ग्रिपेन यांचा समावेश आहे. राफेलसारख्या प्रगत विमानांना उडवण्यासाठी दीर्घ आणि कठोर प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता असली तरी, भविष्यातील संघर्षांमध्ये ही विमाने निर्णायक भूमिका बजावतील असा युक्रेनचा विश्वास आहे.

Comments are closed.