राहुल द्रविड झाला ‘या’ संघाचा मालक; IPL संपताच रंगणार नवी टी-20 लीग!

भारताचा दिग्गज फलंदाज आणि विश्वचषक विजेत्या संघाचा प्रशिक्षक, राहुल द्रविडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. युरोपियन टी-20 प्रीमियर लीगमध्ये (ETPL) ‘डब्लिन’ फ्रँचायझीचा मालक म्हणून राहुल द्रविडच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नाव ‘डब्लिन गार्डियन्स’ (Dublin Guardians) असे ठेवण्यात आले असून, त्याच्या सहभागामुळे या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सहा फ्रँचायझी आता निश्चित झाल्या आहेत.

या लीगचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत खेळली जाणारी ही सहा संघांची स्पर्धा, युरोपियन क्रिकेटच्या प्रगतीमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिली जात आहे.

‘क्रिकेट आयर्लंड’ने सोमवारी राहुल द्रविडच्या नावाची घोषणा केली. या प्रसंगी अभिषेक बच्चन देखील डब्लिन येथे उपस्थित होता. ‘क्रिकेट आयर्लंड’, ‘क्रिकेट स्कॉटलंड’ आणि ‘रॉयल ​​डच क्रिकेट असोसिएशन’ यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरू झालेली ही ETPL, युरोपमधील पहिली आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी स्पर्धा बनणार आहे. या स्पर्धेत डब्लिन, बेलफास्ट, एडिनबर्ग, ग्लासगो, रॉटरडॅम आणि ॲमस्टरडॅम येथील संघ सहभागी होतील.

या लीगमध्ये मिचेल मार्श, टीम डेव्हिड, मिचेल सँटनर, लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल, फॅफ डू प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

राहुल द्रविड म्हणाला, “ETPL ची व्यापक दृष्टी म्हणजेच युरोपमध्ये क्रिकेटच्या विकासाला चालना देणे आणि उदयोन्मुख खेळाडूंना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीच गोष्ट मला खऱ्या अर्थाने भावली आहे. डब्लिनमध्ये क्रिकेटप्रेमींचा मोठा समुदाय वास्तव्यास आहे. तिथे क्रिकेटच्या विकासाची प्रचंड, अद्याप पूर्णपणे न वापरलेली क्षमता दडलेली आहे. युवा प्रतिभेला घडवणे आणि प्रोत्साहन देणे ही माझ्यासाठी नेहमीच एक प्राथमिकता राहिली आहे.”

ETPL मधील फ्रँचायझी मालकांच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस गेल, स्टीव्ह वॉ आणि जॉन्टी ऱ्होड्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.

Comments are closed.