राहुल द्रविड यांच्या नावावरील 3 मोठे विक्रम! ज्यांच्यासमोर सचिन तेंडुलकरसारखे दिग्गजही पडले मागे!

टीम इंडियाचे दिग्गज आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Team india’s former Cricketer) यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ तुफान धावाच केल्या नाहीत, तर कसोटी क्रिकेटमध्ये असे काही विक्रमही केले जे त्यांच्या फलंदाजीतील मोठे विक्रम ठरले आहेत.
त्यांना ‘द वॉल’ म्हटले जात होते आणि त्याचे कारणही अगदी स्पष्ट होते. ते क्रिजवर आले की, गोलंदाजांना त्यांना बाद करण्यासाठी खूप घाम गाळावा लागायचा. द्रविडच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत, त्यापैकी हे तीन आकडे अतिशय खास आहेत. या तिन्ही बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरही त्यांच्या मागे आहेत.
कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम
द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 31,258 चेंडूंचा सामना केला. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने इतके जास्त चेंडू खेळणे ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. या बाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 29,437 चेंडू खेळले होते. म्हणजेच द्रविडने सचिनपेक्षा सुमारे 1,800 चेंडू जास्त खेळले. हा विक्रम सांगतो की द्रविड किती संयमाने फलंदाजी करत होते. ते प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याऐवजी आपला डाव शांतपणे पुढे नेण्यावर विश्वास ठेवत होते.
कसोटीत सर्वाधिक वेळ फलंदाजी करण्याचा विक्रम
द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तब्बल 44,152 मिनिटे क्रिजवर घालवली. या बाबतीतही त्यांचे नाव सर्वात वर आहे. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 41,304 मिनिटे फलंदाजी केली होती. म्हणजेच इथेही द्रविड त्यांच्या पुढे राहिले.
द्रविडच्या फलंदाजीची हीच खासियत होती की, ते क्रिजवर आल्यावर सहज आपली विकेट देत नसे. अनेकदा त्यांच्या डावाचे महत्त्व केवळ काढलेल्या धावांवरून नव्हे, तर त्यांनी किती वेळ विरोधी गोलंदाजांना त्रस्त केले यावरून समजायचे.
कसोटीत सर्वाधिक शतकीय भागीदारी (Partnerships)
द्रविड यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 88 वेळा 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली. या बाबतीतही तेच अव्वल आहेत. सचिन तेंडुलकर यांनी अशा 86 भागीदारी केल्या होत्या. म्हणजेच इथे दोघांमध्ये फार मोठा फरक नाही, पण हा विक्रम द्रविडच्या नावावर आहे.
विशेष म्हणजे, द्रविड आणि सचिनने एकत्र खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये 20 शतकीय भागीदारी केल्या होत्या. दोघांनी मिळून दीर्घकाळ भारतीय फलंदाजीला भक्कम आधार दिला. द्रविडने भारतासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या. त्यांच्या नावावर 36 शतके आणि 63 अर्धशतके आहेत. कसोटीतील त्यांची सर्वोच्च धावसंख्या 270 धावा होती.
वनडे (ODI) क्रिकेटमध्येही द्रविडने 344 सामने खेळून 10,889 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 12 शतके आणि 83 अर्धशतके झळकावली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय क्रिकेटमधील द्रविडचे योगदान ते निवृत्त झाल्यावर संपले नाही. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि 2024 मध्ये भारताने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टी-20 विश्वचषक जिंकला. द्रविड यांचे हे सर्व विक्रम त्यांच्या त्या जबरदस्त फलंदाजीची साक्ष देतात, ज्यासाठी संपूर्ण क्रिकेट जगतात त्यांना ‘द वॉल’ म्हटले जाते. त्यांचे हे विक्रम अद्याप कोणी मोडले नाहीत, त्यामुळे आता आगामी काळात ते कोण मोडणार याकडे क्रिकेट चाहत्यांच मात्र लक्ष असणार आहे.
Comments are closed.