राहुल गांधींचा पुन्हा 'व्होट हेराफेरी'चा आरोप
हरियाणा निवडणूक : निवडणूक आयोगाचा इन्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात केला आहे. त्या निवडणुकीत 25 लाख मते फिरविण्यात आली. परिणामी काँग्रेसचा पराभव झाला, असे गांधी यांचे म्हणणे आहे.
त्या निवडणुकीत एका महिलेने 22 वेळा वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केला. ही महिला ब्राझीलची एक मॉडेल आहे. तिचेच नाव सीमा, सरस्वती, स्वीटी असे विविध प्रकारे मतदारसूचीत नोंदविले गेले आहे. या सर्व नावांवर छायाचित्र एकाच महिलेचे असून ती महिला ब्राझीलची एक मॉडेल आहे, असेही गांधी यांचे म्हणणे आहे. तसेच हरियाणाच्या निवडणुकीत 5.21 लाख डुप्लिकेट मतदार, 93 हजार 174 अवैध मतदार आणि 19.26 लाख वाढीव मतदार असे जवळपास 25 लाख बनावट मतदार नोंदविण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. अनेक मतदारांची नावे मतदारसूचीतून वगळण्यातही आली होती. त्याचाही फटका काँग्रेसला बसला. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षासाठी काम केले आणि त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचे रुपांतर पराभवात झाले. हे मी पुराव्यासह मांडत आहे, असेही प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. त्यांनी हे आरोप दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
निवडणूक आयोगाचा पलटवार
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे स्पष्ट करत ते फेटाळले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतदारसूची केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या आधी बरेच दिवस दिली होती. काँग्रेसने त्याचवेळी आपले आक्षेप नोंदवावयास हवे होते. काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी काय करत होते? असा प्रश्नही आयोगाने उपस्थित केला. प्रत्येक निवडणुकीआधी आयोग मतदारसूचीचे पुनर्सर्वेक्षण करत असतो. तसे नियमाप्रमाणे करावेच लागते. प्रत्येक राजकीय पक्षाला नवी मतदारसूची निर्माण झाल्यानंतर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पुरेसा वेळही दिला जातो. हरियाणा विधानसभा निवडणुकीतही या नियमांचे पालन आयोगाकडून काटेकोरपणे करण्यात आले होते. तथापि, त्यावेळी काँग्रेसच्या एकाही नेत्याने किंवा निवडणूक प्रतिनिधींनी एकही आक्षेप नोंदविलेला नाही. आता एक वर्षानंतर हाच पक्ष आयोगावर निराधार आरोप करीत आहे, असा पलटवार आयोगाने केला आहे.
भाजपचाही घणाघात
वारंवार मतचोरीचे काल्पनिक आरोप करून राहुल गांधी प्रसिद्धीच्या झोतात राहू पहात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान गुरुवारी होत आहे. त्या निवडणुकीसंबंधी भाष्य करण्याचे सोडून राहुल गांधी वर्षापूर्वी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उगाळत बसले आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो, की बिहारमध्ये आपला पराभव होणार आहे, हे त्यांनी जवळपास मान्य केले आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष स्वत:च्या अकार्यक्षमतेवरून दुसरीकडे हटविण्यासाठी राहुल गांधी हे अकांडतांडव करीत आहेत. तसेच बिहार निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याची पूर्वतयारीही त्यांनी अशाप्रकारे आत्ताच करून ठेवली आहे, असा घणाघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी केला.
ब्राझीलची मॉडेल कोण…
गांधी यांच्या आरोपामुळे ब्राझीलची मॉडेल कोण असा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर सोशल मीडियावर बऱ्याच टिप्पणी केल्या जात आहेत. या मॉडेलचे नाव शोधले जात आहे. तसेच, तिच्या छायाचित्रासंबंधीही बरीच चर्चा होत आहे. पण छायाचित्र हा मतचोरीचा पुरावा होऊ शकतो का, असा प्रश्नही केला जात आहे.
महत्वाच्या मुद्द्याला मात्र नाही स्पर्श
राहुल गांधी यांचा बनावट मतदारांचा आरोप क्षणभर खरा मानला, तरी या सर्व ‘बनावट’ मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच मतदान केले आहे, हे कसे सिद्ध होऊ शकते? असा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे कोणत्या मतदाराने कोणाला मतदान केले हे त्या मतदाराशिवाय कोणालाही समजू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला, याचा अर्थ या सर्व तथाकथित बनावट मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच मतदान केले आहे, असे कसे म्हणता येईल? राहुल गांधी यांच्यापाशी तसा काही पुरावा आहे काय, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांचे लक्ष या मुद्द्याकडे आकर्षित केले आहे.
निवडणूक बिहारमध्ये, आरोप हरियाणासंदर्भात
ड राहुल गांधी यांचे हरियाणा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषदेत आरोप
ड बिहारमध्ये निवडणूक असताना हरियाणाचा विषय का : भाजपचा प्रश्न
ड निवडणूक आयोगाकडून गांधी यांच्या आरोपांचा इन्कार, निराधार आरोप
Comments are closed.