अमित शाह बदनामी प्रकरणी राहुल गांधींनी आरोप फेटाळून लावले आहेत

उत्तर प्रदेशातील न्यायालयासमोर सुनावणीला हजेरी

वृत्तसंस्था/ सुलतानपूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार/आमदार न्यायालयात हजर झाले. याप्रसंगी सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. हा खटला राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असून त्याला कोणताही ठोस पाया नव्हता, असा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला.

सुनावणीदरम्यान उपस्थित असलेल्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी न्यायाधीशांना हात जोडून नमस्कार केला. तसेच सुनावणी संपल्यानंतर त्यांचे आभार मानले. न्यायाधीशांनी राहुल यांना काही प्रश्न विचारत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या सुनावणीसाठी राहुल गांधी सुमारे 20 मिनिटे न्यायालयात राहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मार्च रोजी होईल. यापूर्वी 19 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी सुलतानपूर न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.

राहुल गांधी शुक्रवारी सकाळी दिल्लीहून लखनौ विमानतळावर पोहोचल्यानंतर न्यायालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला. ते न्यायालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या गेटमधून बाहेर काढले.

आठ वर्षांपूर्वीचे प्रकरण

सुलतानपूर येथे सुरू असलेला हा खटला 8 वर्षे जुना आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी अमित शाह यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. प्रामाणिकपणाचा उपदेश करणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षावर हत्यांचा आरोप असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यानंतर सुलतानपूर भाजप नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

Comments are closed.