राहुल गांधी पंजाबमध्ये पूरग्रस्तांना भेटले

गुरदासपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद : ट्रॅक्टरही चालविला

वृत्तसंस्था/ गुरदासपूर

काँग्रेस नेत आणि  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंजाबमधील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी दौरा केला. गुरदासपूर या पूरामुळे सर्वाधिक प्रभावित भागांमध्ये राहुल गांधी पोहोचले. गुरदासपूर येथील गावांमध्ये बंधारे फुटल्याने घरे अन् शेती पाण्याखाली गेली होती. यावेळी राहुल यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि गावात पायी चालल्यावर काही अंतर ट्रॅक्टरही चालविला आहे.

राहुल गांधींनी पूरप्रभावित घोनेवाल गावाचा दौरा केला, यादरम्यान त्यांनी घरांचे नुकसान झालेल्या लोकांची भेट घेतली. तर तत्पूर्वी अमृतसर येथे पोहोचल्यावर राहुल गांधी यांचे स्थानिक नेत्यांनी स्वागत केले. पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वासोबत राहुल गांधींनी गुरुद्वारा श्री समाध बाबा बुड्ढा साहिबमध्ये डोकं टेकवत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह वडिंग, राज्यातील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा, माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि अन्य नेते उपस्थित होते.

पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे 23 जिल्ह्यांमधील 2097 गावांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 1,91,926 हेक्टरमधील पिकांची हानी झाली आहे. तर 15 जिल्ह्यांमधील कमीतकमी 52 जणांना जीव गमवावा लागला आहे. राहुल गांधी पंजाबच्या वेदना जाणून आहेत. राहुल गांधी यांनी अजनाला येथे प्रभावित भागांचा दौरा करत शेतकरी, मजूर आणि स्थानिक लोकांशी संवाद साधल्याची माहिती काँग्रेस नेते परगट सिंह यांनी दिली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 सप्टेंबर रोजी पंजाबचा दौरा करत राज्याला 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पंतप्रधान मोदींनी पूरसंकटाने प्रभावित शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.

Comments are closed.