जंतरमंतरकडे जाताना अडवून राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांत राहुल गांधी यांना तिसऱ्यांदा ताब्यात..! – TMarathiNews
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीतील आंदोलन तीव्र केले आहे. बुधवारी जंतरमंतर येथे आंदोलनासाठी जात असताना राहुल गांधी, प्रियांका गांधी व इतर विरोधी खासदारांना दिल्ली पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. गेल्या दोन दिवसांत राहुल गांधी यांना तिसऱ्यांदा ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक झाल्यानंतर ते तीन बसमधून जंतरमंतरकडे रवाना झाले. मात्र, आंदोलनस्थळापासून काही अंतर आधीच पोलिसांनी बस अडवल्या. त्यानंतर राहुल गांधी आणि अन्य खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रियांका गांधी यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
SIR प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (SIR) विरोध करत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांच्या मते, मतदार यादीतून नावे वगळण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी आणि संबंधित मतदारांना योग्य संधी मिळावी. या मुद्द्यावरूनच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने विरोधकांच्या काही आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली असून, मंगळवारी दुपारपर्यंत खासदारांकडून औपचारिक भेटीची मागणी प्राप्त झाली नसल्याचे आयोगाने म्हटले होते.
विरोधकांच्या प्रमुख मागण्या
इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा.
- SIR प्रक्रियेत मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत.
- मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन अपीलची संधी द्यावी.
- निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारीही राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अन्य विरोधी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात सुमारे आठ ते नऊ तास ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले होते.
Comments are closed.