'राहुल गांधींनी फक्त स्वप्न बघत रहावे'

पुढील 30 वर्षे तरी नेतृत्त्वाची संधी नाही : मतचोरीच्या आरोपांवर अमित शाह यांचा पलटवार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतचोरीच्या आरोपांवर पलटवार करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. राहुल गांधी स्वप्न पाहत आहेत. कोणतेही आरोप केले तरी राहुल गांधी यशस्वी होणार नाहीत. पुढील 30 वर्षे त्यांची गणना होणार नसल्याने नेतृत्त्वाची संधी मिळणार नाही, असे  शाह म्हणाले. काँग्रेसच्या सध्याच्या राजकारणाच्या आधारावर, ते पुढील 30 वर्षे सरकार स्थापन करू शकणार नाहीत, असेही शाह यांनी स्पष्टपणे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 8,941 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार निशाणा साधला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भाजपवर ‘मतचोरी’चा आरोप करतात, पण ते स्वत:च अनेक राज्यांमध्ये दशकांपासून सत्तेबाहेर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक राज्यांमधील काँग्रेसच्या पराभवाचा संदर्भ देत अमित शाह यांनी गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, दिल्ली आणि आसाममध्ये सरकार स्थापन करण्यात पक्षाला आलेल्या अपयशाचा उल्लेख केला. जर काँग्रेसच्या पराभवाला निवडणूक आयोग आणि ईव्हीएम जबाबदार असतील, तर विविध राज्यांमधील त्यांच्या खराब निवडणूक कामगिरीचे कारण काय आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मतचोरीच्या आरोपावरून विरोधकांना फटकारले

भाजप जनतेच्या पाठिंब्याने निवडणुका जिंकतो असे सांगत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशातील जनतेला आता त्यांचे राजकारण समजले आहे. काँग्रेसने हे समजून घेतले पाहिजे की निवडणुकीतील पराभवासाठी नेहमीच ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाला दोष देता येणार नाही, असेही पुढे त्यांनी सांगितले. निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसचे नेते कधी ईव्हीएमवर, कधी मतदार यादीवर आणि कधी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, जिंकल्यानंतर निवडणूक आयोगाची प्रशंसा करतात. ही त्यांची नीती दुटप्पीपणाची आहे. घुसखोरांची मते वाचवण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करत आहेत, असे आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले.

Comments are closed.