राहुल गांधी यांचे राजकारण द्वेषपूर्ण आहे

अमित शहा यांचा घणाघात, क्षमायाचनेची मागणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे राजकारण नकारात्मक आणि द्वेषाने भरलेले आहे, अशी कठोर टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. गांधी यांच्या बिहारमधील एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद भाषेचा उपयोग केला होता. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचाही अश्लाघ्य भाषेत उल्लेख केला होता. गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडूनही त्यांनी या कार्यकर्त्याला थांबविले नव्हते. या प्रकाराचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. नंतर या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.

अमित शहा यांनी या संदर्भात गांधी यांच्यावर कडाडून प्रतिहल्ला चढविला. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिगत अपमान करणारी वक्तव्ये केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग, जयराम रमेश, रेणुका चौधरी आदी महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अशा अपमानास्पद भाषेचा उपयोग सातत्याने केला आहे. हातातली सत्ता गेली, की काँग्रेस नेते अशा प्रकारे अस्वस्थ आणि सैरभैर होतात आणि त्यांचा संयम सुटतो, असा घणाघात त्यांनी केला.

प्रकरण नेमके काय आहे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ काढली आहे. ही यात्रा दोन दिवसांपूर्वी दरभंगा येथे पोहचली. तेथे एका जाहीर सभेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित असताना, एका काँग्रेस कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत गलिच्छ भाषेत व्यासपीठावरुन घोषणा दिल्या. तसेच त्याने त्यांच्या आईसंबंधीही अवांछनीय उद्गार काढले. त्यानंतर ही यात्रा पुढे गेली. या प्रकाराचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून त्याच्यावर अनेक सर्वसामान्य लोकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कार्यकर्त्याला अटक

बिहारच्या पोलिसांनी या अपमानजनक घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत असून त्याने अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग का केला, याची माहिती घेतली जात आहे. हा प्रकार त्याने उत्स्फूर्तपणे केला की त्याच्याकडून करवून घेण्यात आला, हे शोधले जात आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी हा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचाच ‘एजंट’ असल्याचा आरोप केला आहे. त्याला हेतुपुरस्सर काँग्रेसच्या कार्यक्रमात सोडण्यात आले होते. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा द्याव्यात, हे त्याच पक्षाचे कारस्थान आहे, असा बचाव करत त्यांनी सारवासारवीचा प्रयत्न केला.

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

या प्रकारामुळे बिहारची राजधानी पाटणा येथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्यांनी तडाखे दिले. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर मारामारीला तोंड फुटले. दोन्ही बाजूंचे काही कार्यकर्ते या मारामारीत जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.

नितीशकुमार यांच्याकडून निषेध

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमात झालेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. हा प्रकार राजकीय पातळी घसरविणारा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर असे प्रकार व्हावेत हे अशोभनीय आहे, अशी टीका नितीशकुमार यांनी केली आहे.

Comments are closed.