राहुल गांधी यांचे विधान बेजबाबदार आहेत.
चीनसंबंधी वक्तव्यावरुन राजनाथसिंग यांची टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनने भारताचा 4,000 चौरस किलोमीटरचा भूभाग बळकाविला आहे, हे राहुल गांधी यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असून त्यात काडीइतकाही सत्यांश नाही, अशी स्पष्टोक्ती संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. गांधी यांनी हे विधान सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत केले होते.
भारताच्या भूसेना प्रमुखांनीही चीनच्या घुसखोरीची कबुली दिली आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भूसेना प्रमुखांनी असे कोणतेही विधान केलेले नसून राहुल गांधी लोकांची दिशाभूल करीत आहेत. देशहिताच्या मुद्द्यांवरही ते अशा प्रकारे आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशीही टीका राजनाथसिंग यांनी केली आहे.
विधानांचा विपर्यास
राजनाथसिंग यांनी राहुल गांधींच्या दाव्यांवर त्यांचे प्रत्युत्तर ‘एक्स’च्या माध्यमातून दिले आहे. चीनने भारतात घुसखोरी केली आहे, असे कोणतेच विधान भूसेना प्रमुखांनी केलेले नाही. केवळ सीमेवर पारंपरिक विभागांमध्ये देखरेख करत असनाता आजही दोन्ही बाजूंना काही अडचणी येत आहेत, असे विधान त्यांनी केले होते. तसेच चीनशी झालेल्या चर्चेतून या समस्याही आता दूर करण्यात आलेल्या आहेत, अशीही स्पष्टोक्ती भूसेना प्रमुखांनी केली होती. तथापि, राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात राहुल गांधी यांनी भूसेना प्रमुखांच्या विधानांचा हेतुपुरस्सर विपर्यास चालविलेला आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या काळातच भूमी गमावली
भारताची भूमी चीनने काँग्रेसच्या काळातच हिसकावून घेतलेली होती. अक्साई चीनच्या भागातील भारताच्या प्रदेशातील 38 हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश चीनने 1962 च्या युद्धात भारताकडून हिसकावला होता. त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ता होती आणि त्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. 1963 मध्ये काँग्रेसच्याच काळात भारताचा 5 हजार 180 चौरस किलोमीटरचा प्रदेश पाकिस्तानने चीनला परस्पर देऊन टाकला होता. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी काँग्रेसची नामुष्की लपविण्यासाठी आमच्या सरकारवर धादांत खोटे आरोप करीत आहेत. हे अशोभनीय आहे, असा टोला राजनाथसिंग यांनी लगावला आहे.
पुरावा द्यावा लागेल
लोकसभेतील भाषणात राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांना त्यांचे आरोप सिद्ध करणारे पुरावे द्यावे लागतील, असा इशारा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी लोकसभेत दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी बिर्ला यांच्याकडे गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन नोटीस दिली आहे. बिर्ला यांनी नोटीस स्वीकारल्यास गांधी यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यांची काही विधाने सभागृहाच्या नोंदींमधून पुसण्यात आली आहेत.
Comments are closed.