अभिप्राय – महासागरांचा रोचक वेध!

>> राहुल गोखले

पृथ्वीचा सत्तर टक्के भाग व्यापणाऱया महासागरांविषयी सर्वसामान्यांना असणारी माहिती त्रोटक आणि अगदीच वरवरची असते. भरती-ओहोटी, समुद्राच्या लाटा, खाऱया पाण्यातील मासे, समुद्री वारे इतपतच सागराशी सामान्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेला असतो. पण महासागराची खोली आणि विस्तीर्णता अफाट आणि अचाट अशी आहे. महासागर अनेकविध वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत आणि खनिजांपासून जिवाणू-विष्णूंपर्यंत वैविध्याने समृद्ध आहेत. या सगळ्याची मराठीत एकाच ठिकाणी माहिती क्वचितच उपलब्ध होते. ती उणीव ‘महासागरः समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख’ या पुस्तकाने भरून काढली आहे. रविराज गंधे व डॉ. नंदिनी देशमुख यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात स्वत डॉ. देशमुख यांच्यासह प्रा. किशोर पवार, अदिती जोगळेकर, डॉ. राजीव भाटकर, डॉ. स्वप्नजा मोहिते प्रभृती अभ्यासकांनी महासागरांशी निगडित विविध पैलूंवर शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकला आहे.

पुस्तकात सात विभाग आहेत. समुद्रसाक्षरता हा पहिला विभाग वाचकांना समुद्राची तोंडओळख करून देणारा. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर इत्यादी महासागरांची प्राथमिक माहिती या विभागातील लेखांतून मिळते. हिंदी महासागराला हे नाव 1555 पासूनच मिळाले आहे, अशी रंजक माहिती लेखक देतात. तापमान वैविध्याचा परिणाम म्हणून उष्ण आणि शीत असे सागरी प्रवाह जन्म घेतात; महासागरांच्या वेगवेगळ्या भागांत पाण्याचे तापमान भिन्न असते. सुमारे दोनशे मीटर खोलीच्या पलीकडे सूर्यप्रकाश पोचत नाही इत्यादी माहिती देतानाच समुद्राच्या वेगवेगळ्या भागांतील नेमके तापमान मोजण्याचे आधुनिक तंत्रज्ञान कसे विकसित झाले आहे याचीही माहिती पुस्तकातून मिळते. एल निनो, ला निना, नैऋत्य मान्सून आदी संकल्पना लेखकांनी सोप्या भाषेत उलगडून दाखविल्या आहेत.

महासागरांच्या अंतरंगात असणारे जीवसृष्टीचे आणि रासायनिक-खनिज वैविध्याचे लेखकांनी घडविलेले दर्शन थक्क करणारे. समुद्राचे पाणी खारे असले तरी सर्वच समुद्रांत ते एकसारखे खारे नसते. जागतिक स्तरावरील आणि भारतातील सर्वांत खाऱया जलाशयांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. अधिक क्षारयुक्त पाणी असूनही अशा पाण्यातदेखील क्षार-प्रिय कवचधारी प्राणी अस्तित्वात असतात हे वाचून निसर्गाच्या किमयेचे ‘कवतिक‘ वाटल्याखेरीज राहणार नाही. सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून प्रकाश संश्लेषण करून स्वतचे अन्न तयार करणाऱया सूक्ष्म, नीलहरित जिवाणूंपासून खोल समुद्राच्या तळाशी पाण्याचा प्रचंड दाब सहन करूनही तग धरणाऱया विघटनकारी जिवाणुंपर्यंत व खाऱ्या पाण्यातील मगरींपासून समुद्री पक्ष्यांपर्यंतची माहिती या अद्भुत विश्वाचे अचंबित करणारे दर्शन वाचकांना घडवेल.

जेलीफिश नाव परिचयाचे. त्यांना लेखकांनी सागरातील तण म्हटले आहे. त्यांची संख्या वाढणे म्हणजे पर्यावरण ढासळण्याचे लक्षण होय, असा इशारा लेखक देतात. सागरी जलचरांबद्दल विस्ताराने माहिती देतानाच देवमासा हा मासा असल्याचा गैरसमज लेखक ओघात दूर करतात. तो सस्तन प्राणी असल्याने देवमासा हा शब्द आता वापरला जात नाही. चिखलमय, वालुकामय, खडकाळ समुद्रकिनाऱयांवरील जीवसृष्टी ही निरनिराळी असते. त्यांचेही दर्शन पुस्तकातून घडेल. जितकी सागरी प्राणिसृष्टी वैविध्यपूर्ण तितकीच वनस्पतिसृष्टीदेखील याचा प्रत्यय देणारे लेख पुस्तकात आहेत. भारतात खारफुटीच्या 80 प्रजाती आहेत आणि त्यांतील वीस जाती महाराष्ट्रात आढळतात. खारफुटी लाभदायी असल्याने त्यांचे संवर्धन होणे हितकारक आहे, असे आवाहन लेखकांनी केले आहे.

पुस्तकातील चिंतनीय भाग म्हणजे समुद्रांसंबंधी समस्या मांडणारा विभाग. नैसर्गिक आपत्तीबरोबरच निसर्गात चिंताजनक अशा मानवी हस्तक्षेपाचे पर्यवसान हवामान बदल, जागतिक तापमान वाढ अशी संकटे निर्माण होण्यात झाले आहे. त्यांच्या दुष्परिणामांपासून महासागर अस्पर्शित नाहीत. प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून तेलगळतीपर्यंत आणि पाणबुडय़ा व प्रचंड जहाजांमुळे होणाऱया ध्वनिप्रदूषणापासून समुद्रांत घालण्यात येणाऱया भरावांपर्यंत अनेक मानवनिर्मित समस्यांमुळे सागरांमधील जीवसृष्टीच धोक्यात येते. पर्यावरणाच्या ऱहासाचे हे लक्षण होय असा इशारा पुस्तक देते. क्लिष्ट भाषा टाळून महासागरांचा हा शास्त्राrय धांडोळा वाचकांना उद्बोधक वाटेल. समर्पक रंगीत छायाचित्रांनी पुस्तकाची रंगत वाढविली आहे.

महासागर ः समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख
संपादक ः रविराज गंधे, डॉ. नंदिनी देशमुख
प्रकाशक ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे ः 260, ह मूल्य ः 400 रुपये

Comments are closed.