राहुल मामकुतेथिल निलंबनानंतरही विधानसभेत पोहोचले

काँग्रेस नेत्यांच्या नाराजीनंतर परतले : लैंगिक शोषणाचा आरोप

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळच्या पलक्कडचे आमदार राहुल ममकूटाथिल यांना काँग्रेसने निलंबित पेले आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यावर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. निलंबानंतर राहुल ममकूटाथिल हे पहिल्यांदा सार्वजनिक स्वरुपात दिसून आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नेमोम शजीर आणि काही अन्य सहकाऱ्यांसोबत ममकूटाथिल हे विधानसभा परिसरात पोहोचले होते. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या सभागृहातील उपस्थितीवर आक्षेप घेतल्याने ममकूटाथिल यांना तेथून परतावे लागले आहे. विधानसभेतून काढता पाय घ्यावा लागल्यावर राहुल ममकूटाथिल यांनी प्रसारमाध्यमांसमोर काहीही बोलण्यास नकार दिला. तत्पूर्वी एफएसआय कार्यकर्त्यांनी आमदाराचे वाहन रोखत निदर्शनेही केली होती. पोलिसांनी निदर्शकांना तेथून हटविले होते.

विधानसभा अधिवेशनात ते सहभागी होणार  की नाही याबद्दल पलक्कडचे आमदार राहुल ममकूटाथिल तसेच काँग्रेस पक्षाने कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही. याचदरम्यान काँग्रेस नेते या प्रकरणापासून अंतर राखताना दिसून आले आणि त्यांनी ममकूटाथिल हे आता काँग्रेसचे सदस्य नसल्याने त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने अंग झटकले

ममकूटाथिल हे आता काँग्रेसच्या विधिमंडळीय गटाचे सदस्य नाहीत. यामुळे आम्ही त्यांच्याशी संबंधित कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील नाही असा दावा लोकसभा खासदार कोडुक्कुन्निल यांनी केला आहे. तर ममकूटाथिल हे विधानसभेत पोहोचल्याप्रकरणी माकप नेते ई.पी. जयराजन यांनी टीका केली आहे. ममकूटाथिल यांचा सभागृहातील प्रवेश हा जाणूनबुजून कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे हे पाऊल जनता आणि विधानसभेचा अपमान करणारे असल्याचे जयराजन यांनी म्हटले आहे.

ममकूटाथिल यांच्यावर गंभीर आरोप

ममकूटाथिल यांनी अलिकडेच युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मल्याळी अभिनेत्री रिनी एन जॉर्ज यांनी ममकूटाथिल यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. यानंतर काही अन्य महिला आणि एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने राहुल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे ममकूटाथिल यांना काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात आले होते.

Comments are closed.