Rahul Solapurkar Marathi actor statement about Chhatrapati Shivaji Maharaj Controversy in marathi


पुणे : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यांच्या विधानावर मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आणि त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. काही राजकीय नेत्यांनीदेखील त्यांच्या या विधानाचा निषेध केला. यानंतर आता स्वतः राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टीकरण देत जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभरही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या विधानाने शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” अशी माफी त्यांनी एका व्हिडीओतून मागितली आहे. (Rahul Solapurkar Marathi actor statement about Chhatrapati Shivaji Maharaj Controversy)

हेही वाचा : Mumbai : काँक्रिट रस्त्यांसाठी 31 मे ची डेडलाईन, रस्त्यांच्या दर्जासाठी आयआयटीची नियुक्ती 

जारी केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले आहेत की, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. दीड ते दोन महिन्यांपूर्वी रिमा अमरापूरकर यांच्या एका पोडकास्टसाठी मी 50 मिनिटांचा एक व्हिडीओ केला होता. त्या मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अग्र्यातून सुटका या विषयावर बोलत होतो. बिकानेरच्या राजवाड्याचे पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी, उर्दू तसेच औरंगजेबाच्या नजीकच्या लोकांच्या काही गोष्टी वाचायला अभ्यास करण्यासाठी मिळाल्या होत्या. त्यामधील काही गोष्टी सांगताना मी काही विधाने केली. यावेळी, महाराजांनी कोणाला रत्ने दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केले? हे सांगत असताना याचे एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना कशापद्धतीने आपल्या बाजूने वळवून स्वतःची कशी सुटका करून घेतली? हे सांगत होतो. यावेळी मी लाच हा शब्द वापरला.” असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

अभिनेते राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, “साम, दाम, दंड, भेद या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठे राज्यकर्त्ये होऊन गेले, हे मी सांगण्याची गरज नाही. फक्त कोणी तरी दोन वाक्य काढून वाद निर्माण केला. यात कोणताही माझा हेतू नाही. नखंभरसुद्धा अपमान करण्याचा हेतू माझा नाही. कथा कशी रंगवली जाते हे सांगताना माझ्याकडून चूक झाली. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर माझ्याकडून स्वप्नात काहीही होणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी या पुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलणारही नाही. कृपया शिवभक्तांनी वाद थांबवावा. मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. लाचखोर माणसेही औरंगजेबाकडे होती. मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत जाहीर माफी मागितली आहे.

राहुल सोलापूरकर यांचे विधान काय?

“शिवाजी महाराज यांच्या काळात पेटारे-बिटारे, असं काहीच नव्हते. शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराज यांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो…,” असं राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.



Source link

Comments are closed.