वीज बिल वसुलीसाठी शेतीपंपाचे रोहित्र 15 दिवसांपासून बंद; राहुरीतील संतप्त शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखला
वीज बिलांच्या वसुलीसाठी राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील धरणग्रस्त चिंचाळे, घोरपडवाडी, कुरणवाडी, वावरथ, जांभळी, गडदे आखाडा या गावातील शेतीपंपाला वीजपुरवठा करणारे रोहित्र गेल्या 15 दिवसांपासून बंद केल्याने संतप्त शेतकऱयांनी दुभती जनावरे सोबत घेऊन आज दुपारी नगर-मनमाड राज्य महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. या वेळी शेतकऱयांना वेठीस धरणाऱया ‘महावितरण अधिकाऱयांचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘ऊर्जामंत्र्याचा निषेध असो’ या घोषणांनी शेतकऱयांनी परिसर दणाणून टाकला.
दरम्यान, महावितरणचे अधिकारी एसीमध्ये बसून हप्ते खात असल्याने या मुजोर अधिकाऱयांना शेतकऱयांच्या पिकांच्या होणाऱया नुकसानीचे काही देणे-घेणे नसून, शेतीपंपाला वीजपुरवठा करणारे रोहित्र बंद करून शेतकऱयांच्या मुळावर उठलेल्या अधिकाऱयांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्यास महावितरण कार्यालय फोडण्यात येईल, असा इशारा धरणग्रस्त शेतकऱयांनी दिला आहे. शेतकऱयांचा आक्रमक पवित्रा पाहून महावितरण अधिकाऱयांची भंबेरी उडाली. अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल; मात्र महिन्याभरात वीज बिल भरावे अशी नमती भूमिका महावितरण अधिकाऱयांनी घेतल्याने एक तास चाललेले रास्ता रोको आंदोलन शेतकऱयांनी मागे घेतले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले, ‘महायुती सरकारची भूमिका शेतकरीविरोधी राहिली आहे. एकीकडे शेतकऱयांच्या वीजपंपाच्या वीजबिल माफीची घोषणा केली जात असताना दुसरीकडे वीज बिल वसुलीसाठी महावितरण अधिकाऱयांकडून शेतकऱयांना वेठीस धरले जात आहे. शेतकऱयांच्या वीजपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणाऱया ऊर्जामंत्र्याचा जाहीर निषेध करून काळे फासले जाईल’, असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला.
यावेळी बाजार समिती संचालक रामदास बाचकर म्हणाले, ‘गेल्या 15 दिवसांपासून मुळा धरणाच्या बॅकवॉटर भागातील डीपी बंद केल्या आहेत. पेरणी केलेली खरीप पिके उतरून पडले आहेत. उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. या पिकांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.’ या वेळी वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, डॉ. आघाव, अण्णासाहेब सोडनर यांची भाषणे झाली.
तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱयांशी संवाद साधला. यावेळी खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडला नाही तर शेतकऱयांनी लढा सुरूच ठेवावा, असे सांगितले.
Comments are closed.