राहुरीत होंडा सिटी कारमधून 10 वासरांची वाहतूक

कत्तलीसाठी एक महिना वयाची गायीची 10 वासरे निर्दयपणे घेऊन जात असलेली होंडा सिटी मोटार गावकऱयांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. गावकरी आल्याचा सुगावा लागल्याने गायीच्या वासरांची तस्करी करणारे तीन गुन्हेगार दुचाकीवरून पसार झाले.

तालुक्यातील दवणगाव येथे 16 जूनला सायंकाळी ही घटना घडली. दवणगाव येथे एका होंडा सिटी कारमध्ये कत्तल करण्यासाठी गायीची एक महिन्याची वासरे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच गावकऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन 10 वासरे आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांना खबर दिली.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ, बबन राठोड, जाधव, वाघमारे, सूरज गायकवाड, नदीम शेख यांनी घटनास्थळी जाऊन होंडा सिटी कारची पाहणी केली. यामध्ये एक महिना वयाची गायीची 10 वासरे निर्दयीपणे कोंबून ठेवलेली आढळली. पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीची कार व गायीचे वासरे ताब्यात घेतली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीष कुऱहाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालक, तसेच दुचाकीवर फरार झालेल्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

चार दिवसांपूर्वी केली होती 25 गायींची सुटका

चार दिवसांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठ मुळा उजवा कालवा परिसराजवळील वन विभागाच्या क्षेत्रात काही इसमांनी 100 ते 150 गावरान गायींना बंदिस्त केले होते. या ठिकाणावरून गायींची कत्तलीसाठी विक्री होत असल्याची तक्रार गोरक्षकांनी केल्याने 25 गावरान गायींची सुटका झाली होती. कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी जाताच आरोपी पळून गेले. गोवंश तस्करी, तसेच त्यांची कत्तल हा गंभीर गुन्हा असताना राहुरी तालुक्यात स्थानिक राजकीय पुढाऱयांच्या कार्यकर्त्यांच्या छुप्या पाठिंब्यावर सर्रासपणे गोतस्करी होत आहे. तसेच काही हॉटेल्सवर गोमांस विक्री सुरू असल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी संबंधितांची चौकशीची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Comments are closed.