राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाच्या कामाला वेग, भूसंपादनाची अधिसूचना जारी; देसवंडी, वंजारवाडीतील जमिनींचा समावेश
अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या राहुरी-शनि शिंगणापूर नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे प्रस्तावित 21.84 किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राहुरी तालुक्यासह नेवासा आणि परिसरातील धार्मिक, पर्यटन तसेच आर्थिक विकासाला हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः देशभरातून भाविक येणाऱया शनिशिंगणापूरला थेट रेल्वे जोडणी मिळाल्यास या परिसरातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादित करण्याचा मानस स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील देसवंडी आणि नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. राजपत्रातील अनुसूचीमध्ये संबंधित जमिनींचे गट क्रमांक, जमीनधारकांची नावे, जमिनीचे एकूण क्षेत्रफळ आणि रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणारे क्षेत्र यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्ग हा केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित न राहता परिसराच्या आर्थिक, व्यापारी आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. राहुरी आणि आसपासच्या भागातील कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही भविष्यात रेल्वे संपर्काचा फायदा होण्याची शक्यता आहे. राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध प्रशासकीय प्रक्रिया, सर्वेक्षण आणि भूसंपादनाच्या अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला अपेक्षित वेग मिळत नव्हता. आता भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अधिसूचना निघाली असली तरी प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम वेगाने पुढे नेणे आणि जमीनधारकांना नियमानुसार भरपाई देणे हे पुढील टप्प्यातील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.
Comments are closed.