वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापुरात झाडाझडती; ठाण्यातील आयव्हीएफ सेंटर्स पोलिसांच्या रडारवर, १० लाख रुपये किमतीचा औषध साठा जप्त
बदलापुरातील सरोगसी कांडानंतर ठाण्यातील आयव्हीएफ सेंटर्स पोलिसांच्या रडारवर आले आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे बदलापूर पोलिसांच्या तीन पथकांनी ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसेच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईत तब्बल १० लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून या रॅकेटमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोरगरीब महिलांची फसवणूक करून दलाल आणि काही डॉक्टरांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा आहे.
बदलापुरातील एका पीडित महिलेने दिलेल्या माहितीनंतर बेकायदा सरोगसी कांडाचा भंडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री जोवेली गावात छापा टाकून सुलक्षणा गाडेकर व तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांना बेड्या ठोकल्या. या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून अंडाशय तस्करीमागे आंतरराज्य टोळी असण्याचा दाट संशय आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या तीन पथकांनी बदलापूर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ तसेच ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर छापे टाकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामध्ये १० लाखांचे इंजेक्शन्स तसेच अन्य औषध साठा जप्त केला आहे. विठ्ठलवाडी व ठाण्यातील काही डॉक्टर्स आणि आयव्हीएफ सेंटर्सची कसून चौकशी केली जात असून त्याआधारे अंडाशय खरेदी करणाऱ्या देशभरातील दलालांचे धागेदोरे शोधले जात आहेत.
बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले
सरोगसी कांड धसास लावण्यासाठी दलालांनी गोरगरीब महिलांना हेरून त्यांचे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड बनवले. धक्कादायक म्हणजे अंडाशयाच्या या बेकायदा बाजारातून जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी अनेक पीडित महिलांना वारंवार हर्मोन्सचे इंजेक्शन दिले जात होते. अंडबिजे तयार झाली की या पीडितांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असे. तिथे शस्त्रक्रिया करून अंडविजांची दलालांच्या मदतीने तस्करी केली जात होती, अशी माहिती काही पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
अहवाल येताच कारवाईचा बडगा
बदलापुरातील सरोगसी कांडाबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यासंदर्भात आरोग्य विभागाच्या संचालकांना माहिती घेण्याची सूचना केली असून पोलिसांबरोबरच आमचा आरोग्य विभागदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण अहवाल येणार असून त्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आबिटकर यांनी दिला.
Comments are closed.