जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी छापे टाकण्यात आले
लष्कराकडून शोधमोहीम : परिसरातील घरांची झडती
मंडळ संस्था/श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये तळागाळातील दहशतवादी नेटवर्क्स उखडून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात असून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोमोहीम सुरू केली आहे. रविवारी दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या नेटवर्क्सविरुद्ध शून्य सहनशीलता धोरणांतर्गत कुलगाम आणि रामबन जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. रामबन जिह्यात पोलीस, लष्कर, सीआरपीएफ आणि एसओजी युनिट्सच्या संयुक्त पथकांनी ड्युटी मॅजिस्ट्रेटसह जिह्यातील विविध संवेदनशील भागात कारवाई केली. सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता संघटित पद्धतीने ही मोहीम पार पाडण्यात आली. पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी हस्तकांच्या संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आणि संवेदनशील भागात सुरक्षा कडक करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान सुरक्षा दलांनी रामबनच्या विविध भागात सक्रिय दहशतवाद्यांचे नातेवाईक, हस्तक आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स यांच्या घरांची झडती घेतली. देशविरोधी किंवा बेकायदेशीर कारवायांना प्रोत्साहन दिले जात नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस पथकांनी अनेक परिसरांची कसून तपासणी केली. पोलिसांनी तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे आणि त्यांच्या क्षेत्रातील संशयास्पद कारवाया किंवा व्यक्तींबद्दल कोणतीही महत्त्वाची माहिती सामायिक करण्याचे आवाहन सर्वसामान्य लोकांना केले. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
संशयितांची झाडाझडती
कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी जिह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. या कारवाईत ओजीडब्ल्यू, यूएपीए आणि पीएसए अंतर्गत अटक केलेल्या व्यक्ती, समर्थक आणि मृत आणि सक्रिय दहशतवाद्यांचे नातेवाईक यांच्या घरे आणि इतर लपण्याच्या ठिकाणांची झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियाच्या गैरवापराच्या संदर्भात पाच जिह्यांमध्ये छापे टाकले. पुलवामा, शोपियान, श्रीनगर, बारामुल्ला आणि कुलगाम येथे कसून तपासणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Comments are closed.