Raigad dpdc meeting under ajit pawar not attended eknath shinde shivsena mla gogawale thorave and dalavi


मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाली होती. अजूनही पालकमंत्रिपदाचा वाद सुटलेला नसताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदेंच्या आमदारांना निमंत्रित करण्यात आले नाहीत. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रमाणालीच्या ( ऑनलाईन ) रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ पातळीवरून आम्हाला बैठकीची माहिती दिली नाही, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

हेही वाचा : 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, चॅर्टर्ड प्लेनसाठी 68 लाख, पप्पा रागवतील म्हणून…; सावंतांच्या मुलाची ‘आतली बातमी’

एकीकडे शिंदेंच्या आमदारांकडून भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन राष्ट्रवादीचाच होल्ड ( वर्चस्व ) जिल्ह्यावर राहील, असे दाखवून दिले आहे. त्यासह बैठकीला आमंत्रित केले नाही, असे शिंदेंच्या आमदारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना डावलण्यात आले का? असा सवाल उपस्थित होत आहे. परंतु, बैठकीसाठी भरत गोगावले यांना आमंत्रित करण्यात आले होते, असे अजितदादांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना निमंत्रण नसल्याने डावलण्यात आले का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करू…

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महेंद्र थोरवे म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. ही बैठक पार पडल्याची आम्हाला बातम्यांमधून माहिती मिळाली. अधिक माहिती आम्हाला माहिती नाही. बैठकीबाबत आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठ स्तरावरून कल्पना देण्यात आली नाही. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करू. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, अशी बैठक आम्हाला विश्वासात घेऊन केली पाहिजे.”

बैठकीसाठी न बोलवून आमचा अवमान केला…

आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले, “बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण नव्हते. खरे म्हणजे अजितदादांच्या उपस्थित बैठक झाली. आदिती तटकरे बैठकीसाठी उपस्थित होत्या. पण, आम्हा तीनही आमदारांना कल्पना नव्हती किंवा निमंत्रण नव्हते. जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. ही बैठकी अधिकृत की अनधिकृत होती, हे आम्हाला माहिती नाही. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत नक्कीच चर्चा करणार आहोत. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटला नाही. भरत गोगावले हे पालकमंत्री व्हायला पाहिजे. आम्हाला बैठकीसाठी न बोलवून आमचा अवमान केला.”

हेही वाचा : अजित पवार-एकनाथ शिंदेंमध्ये झाली बैठक, मुंबईच्या प्रश्नांवर केली चर्चा



Source link

Comments are closed.