किल्ले रायगडावर यावर्षी मावळ्यांची कूच सुरक्षित होणार; उंच कड्यावरील सुटलेले दगड युद्धपातळीवर काढणार

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हजारो मावळे रायगड किल्ल्यावर कूच करतात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात उंच कड्यावरील दरड कोसळून शिवभक्तांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे शिवभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने उंच कड्यावरील सुटलेले दगड काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात तारीख व तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असल्याने युद्धपातळीवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ले रायगडावर मावळ्यांची कूच यावेळी सुरक्षित होणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी पार पडणार आहे. त्यामुळे हजारो मावळे किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करणार आहेत. २०२३ मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या एका शिवभक्ताचा अंगावर भलामोठा दगड कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीरतेने दखल घेत रायगड किल्ल्याच्या उंच कड्यावरील सुटलेले दगड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २८ व २९ मे या कालावधीत ही मोहीम पार पडणार आहे. दरम्यान पायरी मार्गाने गड चढणाऱ्या मावळ्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता विशेष पथक व दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी निखळलेले दगड काढण्यासाठी प्रशिक्षित रॅपलर्सची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
रोप वे सुविधा सुरू राहणार
सुटलेले दगड काढण्याच्या मोहिमेदरम्यान चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर, होळीचा माळ व इतर आवश्यक प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून हा मार्ग पायी वाटचालीसाठी बंद ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत, तर या कालावधीत रायगड रोप वेची सुविधा सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Comments are closed.