Raigad Guardianship given to Aditi Tatkare apart from Bharat Gogavale
मुंबई : कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार? याचे उत्तर आता राज्य सरकारने दिले असून महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. सत्तास्थापनेनंतर राज्यात आधी मंत्रिपदावरून तर त्यानंतर पालकमंत्रिपदावरून महायुतीतील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. अशामध्ये आता अखेर रायगडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार? याचे उत्तर समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना डावलून रायगडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. (Raigad Guardianship given to Aditi Tatkare apart from Bharat Gogavale)
हेही वाचा : Maharashtra Guardian Minister : पवारांकडे बीडचे पालकमंत्रिपद तर मुंडेंना डच्चू, अखेर यादी जाहीर
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात थेट सामना पाहायला मिळत होता. अनेकदा मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर दावा ठोकला होता. ते रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. त्यांनी एकदा विधान केले होते की, “जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि भाजपचे तीन आमदार पाठिशी असल्यामुळे नवीन वर्षात पालकमंत्रीपदाची भेट मिळेल,” असे विधान करत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा केला होता. महायुतीचे सरकार बहुमतात आले असले तरी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधीपासून मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. त्यामुळेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला असला तरी मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमधील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर रोजी झाला. अधिवेशन संपल्यानंतर 21 डिसेंबरला उशिरा खातेवाटप झाले. पण त्यानंतर महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचेदेखील अनेकदा समोर आले.
वादग्रस्त विधानाचा फटका?
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला होता. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी अनेकदा याबाबत इच्छा बोलून दाखवली होती. तसेच, त्यांनी एकदा मंत्री अदिती तटकरे यांच्याबद्दल वादग्रस्तविधानदेखील केले होते. “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगले काम केले. पण तरी मी त्यांच्यापेक्षा अधिक चांगले काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे फक्त महायुतीतीलच नव्हे तर विरोधकांनीही त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत टीका केली होती.
Comments are closed.