मिडलाईनने राजाभाऊ देसाई चषक जिंकला

ज्या सामन्यात थराराचा तडका अपेक्षित असतो, नेमकं तोच सामना पचपचीत आणि रसभंग करणारा ठरतो. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाची झळ सोसणाऱया रायगडच्या मिडलाईन अॅकॅडमीने ठाणे महानगरपालिकेला धक्का देत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतिचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. मिडलाईनने ठाणे महानगरपालिकेचे आव्हान 32-22 असे सहज परतावून लावत प्रभादेवीत पहिल्यांदाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत अंतिम सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने कबड्डीप्रेमींनी तुफान गर्दी केली होती, पण प्रेक्षकांना अपेक्षित थरार अनुभवता आला नाही. मिडलाईनने मुंबई पोस्टलविरुद्ध जोरदार खेळ दाखवत मध्यंतरालाच 21-17 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पोस्टलच्या सौरभ कुलकर्णी आणि शुभम रहाटेने वेगवान खेळाच्या जोरावर संघाला बरोबरीत आणले होते, मात्र मिडलाईनने शेवटच्या क्षणी सामन्यावर आपली पकड मजबूत करत अंतिम फेरीत धडक मारली. शेवटची दोन मिनिटे असताना आघाडी घेत 39-32 अशा फरकाने मिडलाईनने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर मिडलाईनने आपला हाच खेळ अंतिम फेरीतही कायम राखत कबड्डीप्रेमींना सहज कसे जिंकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले.

प्रफुल्ल झावरे आणि शुभम दिडनाथने अंतिम सामन्यात चढाई-पकडींचा सुसाट खेळ सादर करत मिडलाईनला मध्यंतराला 22-5 अशी जबरदस्त आघाडी मिळवून देत विजयपथावर नेले. मध्यंतरानंतर ठाणे महापालिकेच्या जावेद पठाण आणि सिद्धेश तटकरे यांनी मिडलाईनवर लोण चढवत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. मिडलाईनने 32-22 अशा दणदणीत विजयासह स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आपले पहिलेवहिले जेतेपद संपादले. त्यांचा प्रफुल्ल झावरे स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू ठरला. त्यांच्याच खेळाने मिडलाईनला अनपेक्षितपणे जेतेपद जिंकता आले. त्यांचाच बिट्टू बनिवाल स्पर्धेतील सर्वोत्तम पकडवीर ठरला तर ठाणे महानगरपालिकेच्या साईराज कुंभारने सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा मान मिळवला.

त्याआधी ठाणे महानगरपालिकेने दुसऱया उपांत्य सामन्यात रुपाली ज्वेलर्सचा 43-24 असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली होती. नेहमीच कबड्डीपटूच प्राथमिकता असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने संघासह खेळाडूंवरही पारितोषिकांचा वर्षाव केला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला पाच ग्रॅमचे तर सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडवीराला तीन ग्रॅम सोन्याच्या नाण्याने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार सुनील शिंदे, स्पर्धा आयोजक व आमदार महेश सावंत, मंडळाचे जयराम शेलार आणि शाखाप्रमुख संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला.

Comments are closed.