पोलादपुरातील मराठी शाळांची पाटी फुटली, जिल्हा परिषदेच्या 36 शाळा बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठी भाषा दिन साजरा होऊन जेमतेम पंधरा दिवस उलटले असतानाच पोलादपूर तालुक्यात मराठी शाळांची पाटी फुटली आहे. दुर्गम भागातील रहिवाशांचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेले स्थलांतर तसेच अन्य कारणांमुळे पोलादपूरमधील 36 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या आहेत. पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक उपाय सुचवले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने मराठी शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 164 शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. काही शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. एकूण 248 शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतात. मात्र या शाळांची पटसंख्या सध्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. दुर्गम भागात रोजगाराचे कोणतेही साधन नाही. यामुळे या भागातील कुटुंबे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 36 शाळा बंद झाल्या आहेत.

येथे कायमचे टाळे

पोलादपूर तालुक्यातील जलाचीवाडी, सावरीचीवाडी, महालगूर, आड, तामसडे, मोरेवाडी, येरंडवाडी, कोकबीचीवाडी यांसह 36 ठिकाणाच्या मराठी शाळांना टाळे लागले आहे. अवकाळी कोसळणारा पाऊस, अतिवृष्टी, अल्प मजूर, महागाई आदी कारणांमुळे स्थलांतर वाढले आहे. तर शहरी भागातील पालकही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी इंग्रजी शाळांमध्ये पाठवू लागले असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.

Comments are closed.